भायखळा, वरळी, माझगावसह अनेक भागांत ‘वाईट’ हवा, वांद्रे-कुर्ला संकुलात ‘अतिवाईट’ AQI नोंद
दिवाळीच्या पहिल्या दिवशी फटाक्यांच्या धुरामुळे मुंबईतील हवेचा दर्जा कमालीचा खालावला. सणापूर्वी काहीसा सुधारलेला हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सोमवारी पुन्हा वाढला, आणि शहरावर प्रदूषणाची धूसर चादर पसरली. भायखळा, माझगाव, नेव्ही नगर, कुलाबा (Kulaba), वरळी (Worli) यांसारख्या भागांत हवेचा दर्जा ‘वाईट’ श्रेणीत नोंदवला गेला, तर वांद्रे-कुर्ला संकुलात सलग दुसऱ्या दिवशी AQI 336 इतका राहिला, म्हणजेच हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत होती.सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भायखळ्यात AQI 211, देवनारमध्ये 267, माझगावात 255, वरळीत 213, विलेपार्लेत 215, नेव्ही नगर-कुलाब्यात 279, मालाडमध्ये 215, खेरवाडी-वांद्रेत 203, चकाला येथे 254 आणि बोरिवलीत 228 इतका होता. या सर्व ठिकाणी हवा ‘वाईट’ श्रेणीत होती. दुसरीकडे, चेंबूर (152), कुलाबा (106), घाटकोपर (186), कांदिवली (155), भांडूप (112), कुर्ला (118), शिवडी (131) आणि शिवाजी नगर (141) येथे हवेचा दर्जा ‘मध्यम’ श्रेणीत होता. संपूर्ण मुंबईचा सरासरी AQI 185 इतका ‘मध्यम’ श्रेणीत नोंदवला गेला.
तज्ज्ञांच्या मते, रात्री 10 ते पहाटे 1 आणि सायंकाळी हवेचे प्रदूषण सर्वाधिक तीव्र होते. हिवाळ्यात वाऱ्याचा वेग कमी असल्याने आणि हवा स्थिर राहिल्याने प्रदूषक कण हवेत जास्त काळ तसेच राहतात, त्यामुळे मध्यरात्री आणि पहाटे AQI सर्वात खराब असतो.जागतिक पातळीवर, IQAir च्या अहवालानुसार, या आठवड्याच्या शेवटी मुंबई जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली. मुंबईचा AQI 171 होता, तर दिल्ली 184 AQI सह पहिल्या आणि कोलकाता तिसऱ्या स्थानी होती.मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना सण-उत्सवात फटाके फोडताना सुरक्षात्मक मास्क वापरण्याचे, शक्य असल्यास एअर प्युरिफायर असलेल्या खोलीत राहण्याचे आणि वाहनांचा धूर व बांधकामातील धूळ यांचा संपर्क टाळण्याचे आवाहन केले आहे.




