करनाल कार्यक्रमात मौनी रॉयसोबत गैरवर्तन, छेडछाडीच्या आरोपांनी खळबळ
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने हरियाणातील करनाल येथे झालेल्या एका कार्यक्रमात स्वतःसोबत घडलेल्या धक्कादायक घटनेचा पर्दाफाश केला आहे. इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिने आपला अनुभव शेअर करत, काही प्रेक्षकांच्या वर्तनामुळे आपण मानसिकदृष्ट्या त्रस्त आणि अपमानित झाल्याचं सांगितलं आहे.
मौनीच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ती मंचाकडे जात असताना काही पुरुषांनी फोटो काढण्याच्या बहाण्याने तिच्या कंबरेला स्पर्श केला. तिने त्यांना नम्रपणे हात हटवण्याची विनंती केली, मात्र त्यानंतरही त्यांची वागणूक बदलली नाही.
मंचावर पोहोचल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. दोन वृद्ध व्यक्तींनी तिच्यासमोर उभं राहून अश्लील कमेंट्स, अपमानास्पद इशारे आणि शिवीगाळ सुरू केली. याच दरम्यान, तिच्यावर गुलाब फेकण्यात आले. या सर्व प्रकारामुळे ती परफॉर्मन्स अर्धवट सोडून जाण्याच्या विचारात होती, मात्र काही वेळानंतर तिने पुन्हा मंचावर येत आपली कामगिरी पूर्ण केली.
या संपूर्ण घटनेत आयोजक किंवा उपस्थित लोकांनी हस्तक्षेप न केल्याने मौनीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “इतका गोंधळ होत असतानाही कुणीही त्या व्यक्तींना थांबवलं नाही, हे पाहून मला प्रचंड धक्का बसला,” असं तिने स्पष्ट केलं.
तसंच, मनोरंजनसृष्टीत नव्याने येणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेबाबतही मौनीने चिंता व्यक्त केली आहे. “जर एका ओळखीच्या कलाकारालाच असं सहन करावं लागत असेल, तर नव्या मुलींची अवस्था काय असेल?” असा सवाल करत, अशा घटनांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी तिने केली आहे.




