“मुंबई मराठी माणसाचीच राहिली पाहिजे” – एबी फॉर्म राजगडावरूनच मिळणार, जागांची संख्या अजून गुलदस्त्यात
मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भाजप आणि ठाकरे गटाने उमेदवारांची नावे जाहीर करून त्यांना अधिकृत एबी फॉर्म देत प्रचारालाही वेग दिला आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अद्याप उमेदवारीबाबत कोणतीही ठोस घोषणा झालेली नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मनसे किती जागांवर निवडणूक लढवणार, उमेदवारांना एबी फॉर्म कधी दिले जाणार, याबाबत संभ्रम असतानाच पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, ही निवडणूक केवळ राजकीय नसून देश, महाराष्ट्र आणि विशेषतः मराठी माणसाच्या अस्तित्वाशी संबंधित आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे डावपेच आखले जात असल्याचा आरोप करत त्यांनी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले.
“मुंबई आपल्या ताब्यात राहिली पाहिजे. मुंबई वेगळी करण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावा,” असे आवाहन करत त्यांनी भांडणापेक्षा ही निवडणूक अधिक महत्त्वाची असल्याचे सांगितले. मागील वीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच ठाकरे बंधू युतीमध्ये निवडणूक लढवत असल्याने युतीधर्म पाळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बाळा नांदगावकर म्हणाले की, प्रत्येक जागा ही मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी निर्णायक आहे. ही निवडणूक अस्तित्वाची असून मराठी माणसासाठी मुंबई वाचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत शिवसेना-मनसेच्या उमेदवारांना साथ देण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कोअर टीमला दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
मनसेकडून एबी फॉर्म लवकरच दिले जातील आणि ते राजगड कार्यालयातून वितरित केले जातील, असे स्पष्ट करत त्यांनी जागांच्या संख्येबाबत मात्र गुप्तता राखली. “एबी फॉर्म दिले की किती जागांवर निवडणूक लढवत आहोत, ते आपोआप समजेल,” असे सूचक विधान त्यांनी केले.
सीट वाटपामुळे नाराजी होऊ शकते, हे मान्य करत नांदगावकर म्हणाले की, यापूर्वी मनसेने अनेक निवडणुका स्वबळावर लढवल्या आहेत. काही जागा इकडून तिकडे जाणे स्वाभाविक असून कार्यकर्त्यांनी नाराज न होता पुढील निवडणुकांसाठी तयारी करावी. “अशा निवडणुका ठाकरे बंधू वारंवार लढवणार असून त्यांचे राजकीय भविष्य उज्वल आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




