spot_img

MNS 20th Anniversary : मनसेच्या सभासद नोंदणीला मनोरंजनसृष्टीचा प्रतिसाद; राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कलाकारांचा पक्षात प्रवेश

spot_img

पुष्कर श्रोत्री, भरत जाधव, केदार शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वीकारले मनसेचे सभासदत्व.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाकडून राज्यभर सभासद नोंदणी मोहीम राबवली जात आहे. या उपक्रमाला विविध क्षेत्रांतून प्रतिसाद मिळत असून आता मराठी मनोरंजनसृष्टीतील काही नामांकित कलाकारांनीही मनसेचे सभासदत्व स्वीकारले आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी सभासद नोंदणीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.

या वेळी अभिनेता पुष्कर श्रोत्री, अभिनेते भरत जाधव, दिग्दर्शक केदार शिंदे तसेच प्रसिद्ध जाहिरात क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व भरत दाभोळकर यांनी मनसेचे सभासदत्व घेत पक्षाला आपला पाठिंबा दर्शवला. कार्यक्रमाला मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि मनसे नेत्या शालिनी ठाकरे देखील उपस्थित होत्या.

कार्यक्रमादरम्यान कलाकारांनी पक्षाच्या कार्याबद्दल आपली मते व्यक्त केली आणि विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना पाठिंबा देण्याची भूमिका मांडली. यावेळी बोलताना भरत दाभोळकर यांनी राज ठाकरे यांनी मुंबईसाठी केलेल्या कामाचे कौतुक केले. चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पक्षात औपचारिकरित्या प्रवेश करण्यापेक्षा काही वेळा बाहेरूनही योग्य मार्गदर्शन करता येते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या या सभासद नोंदणी मोहिमेद्वारे विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनी या मोहिमेत सहभाग घेतल्याने पक्षाच्या अभियानाला अधिक बळ मिळाल्याचे मानले जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ