आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव शिगेला पोहोचलेला असताना इराणमध्ये मोठी उलथापालथ झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अमेरिकेसोबतच्या अणुकराराच्या चर्चेत खंड पडल्याच्या पार्श्वभूमीवर इस्त्रायल आणि अमेरिकेकडून हल्ला झाल्याचे वृत्त आहे. या धुमश्चक्रीत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी आणि त्यांच्या कुटुंबियांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणी सरकारी माध्यमांनी दिली असल्याचे सांगितले जाते. देशभरात चिंतेचे वातावरण असून नागरिकांनी आपला सर्वोच्च नेता गमावल्याची भावना व्यक्त केली आहे.
दरम्यान, या अस्थिर पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सांगलीत मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. कृष्णा नदीकाठी उभारलेल्या भव्य मैदानावर भारत विरुद्ध इराण अशी कुस्ती रंगली. भारत केसरी शेरा गुज्जर आणि इराणचा मल्ल मिर्झा इराण यांच्यात सुमारे अर्धा तास जबरदस्त झुंज झाली. संयम, ताकद आणि अचूक डावपेचांच्या जोरावर मिर्झाने गुणांच्या आधारे सामना आपल्या नावावर करत ‘छत्रपती केसरी’ किताब पटकावला.
हा किताब डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मैदानात उपस्थित कुस्तीप्रेमींनी दोन्ही मल्लांचे जोरदार स्वागत केले. पंचक्रोशीतून आलेल्या प्रेक्षकांनी या रोमांचक लढतीचा मनसोक्त आनंद घेतला.
महिला गटात प्रतीक्षा बागडी आणि सोनाली मंडलिक यांच्यात तितकीच चुरशीची लढत झाली. सामना बरोबरीत सुटल्याने टॉसच्या निकालावर सोनाली मंडलिक हिने ‘राजमाता जिजाऊ केसरी’ किताबावर नाव कोरले.
मात्र विजयाच्या आनंदातही मिर्झाच्या चेहऱ्यावर मातृभूमीची काळजी स्पष्ट दिसत होती. देशात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा मायदेशी परतण्याचा मार्ग सध्या बंद झाला आहे. हवाई वाहतूक आणि सुरक्षेच्या कारणांमुळे त्याला काही काळ भारतातच थांबावे लागणार आहे.
एका बाजूला देशातील संकटाची चिंता, तर दुसऱ्या बाजूला सांगलीच्या मातीत मिळवलेलं यश — या दोन्ही टोकांच्या भावनांनी मिर्झा इराणची ही कामगिरी अधिकच चर्चेचा विषय ठरली आहे.




