शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत अनेकांचे संसार उघड्यावर; तपासात सापडलेल्या २४ बेकायदेशीर सिलिंडरमुळे प्रशासनाचे धाबे दणाणले
मुंबईलगतच्या मिरा-भाईंदर परिसरातून एक अतिशय वेदनादायक आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. इंद्रलोक फेज ४ मधील आरक्षित भूखंडावर असलेल्या झोपडपट्टीत काल रात्री ८ च्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीच्या भक्ष्यस्थानी केवळ झोपड्याच पडल्या नाहीत, तर वस्तीत झालेल्या एकापाठोपाठ तीन भीषण सिलिंडर स्फोटांनी संपूर्ण परिसर हादरवून सोडला. या अग्नितांडवात उत्तर प्रदेशचे ४६ वर्षीय गुड्डू राम आणि पश्चिम बंगालचे सुरज मंडळ (१४ वर्षे) व रोहित मंडळ (१५ वर्षे) या दोन अल्पवयीन मुलांचा होरपळून मृत्यू झाला. अवघ्या काही मिनिटांत ५० हून अधिक झोपड्यांचे आणि कष्टकरी कुटुंबांच्या संसाराचे राखेत रूपांतर झाले.
आग लागल्यानंतर परिसरात एकच हाहाकार माजला होता. लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, ही आग विझवल्यानंतर जे सत्य समोर आले, त्याने पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत. ज्या वस्तीत ही भीषण आग लागली, तिथे तपासादरम्यान तब्बल २४ बेकायदेशीर गॅस सिलिंडरचा साठा सापडला आहे.
एकीकडे सामान्य नागरिकांना गॅस मिळवण्यासाठी कसरत करावी लागत असताना, एका झोपडपट्टीत इतक्या मोठ्या प्रमाणात धोकादायक गॅस साठा कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला होता? हा साठा कोणाचा होता? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या स्फोटांमुळे झालेली जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान अत्यंत मोठे असून, जप्त केलेल्या २४ सिलिंडरच्या आधारे प्रशासन आता बेकायदेशीर गॅस रॅकेटचा छडा लावत आहे. या घटनेने झोपडपट्ट्यांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




