मुंब्रा वादावर इम्तियाज जलीलांचा पलटवार; सहर शेख यांच्या पाठीशी एमआयएम ठाम
मुंब्रा येथील एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख या सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला आणि महापालिका निवडणुकीत विजय मिळवला. विजयानंतर “कैसा हराया?” म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर केलेली टिप्पणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.
यानंतर “मुंब्रा हिरवं करू” या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. या प्रकरणी पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली होती आणि त्यांनी माफी मागितल्याची चर्चा देखील समोर आली. मात्र आज एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी मुंब्रामध्ये सहर शेख आणि इतर नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडली.
जलील यांनी सांगितले की, सहर शेख (Sahar Sheikh) यांनी माफी मागू नये, असा सल्ला पक्षाने दिला आहे आणि संपूर्ण एमआयएम पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. “मुंब्रा हिरवं करायचं” या विधानाचा अर्थ विकासाच्या दृष्टीने घ्यायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिकमधील हिरवळ वाचवण्यासाठी लोकांनी एकत्र येऊन आवाज उठवला होता, त्याच भावनेतून हे वक्तव्य पाहिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी जलील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली. “पूर्ण ठाणे भगवा असल्याचं म्हणणं चालतं, पण मुंब्रा हिरवं असल्याचं म्हटलं तर आक्षेप घेतला जातो,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “मी बोलायला लागलो तर अनेकांना अडचणी निर्माण होतील,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.




