सध्या जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे की काय, अशी भीती वाटू लागली आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. भारतासारख्या विकसनशील देशांसाठी हे युद्ध म्हणजे डोकेदुखी ठरत आहे. कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडत आहेत, शेअर बाजार कोसळत आहे आणि महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की जगाच्या पाठीवर असेही काही देश आहेत जे या युद्धाच्या आगीत स्वतःची पोळी भाजून घेत आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलंत! जगात जिथे शांतता असते तिथे या देशांचा व्यापार मंदावतो, पण जसा युद्धाचा धूर निघू लागतो, तशीच या देशांच्या तिजोऱ्या भरू लागतात.
या यादीतलं पहिलं नाव आहे – रशिया. आता तुम्ही म्हणाल, रशिया तर स्वतः युक्रेनसोबत युद्धात अडकला आहे, मग त्यांना कसा काय फायदा होतोय? त्याचे सर्वात मोठे कारण आहे ‘कच्चे तेल’ Crude Oil. जेव्हा जेव्हा मध्य पूर्वेत तणाव वाढतो, तेव्हा जगाला होणारा तेलाचा पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण होते. इराण हा जगातील महत्त्वाचा तेल उत्पादक देश आहे. होर्मुजची सामुद्रधुनी, जिथून जगातील 20% तेलाची वाहतूक होते, ती इराणने बंद केली, त्यामुळे तेलाचे दर प्रति बॅरल 150 ते 200 डॉलरवर जाऊ शकतात. रशिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल निर्यातदार देश आहे. जेव्हा तेलाच्या किमती वाढतात, तेव्हा रशियाला त्यांच्या तेलासाठी जास्त किंमत मिळते. पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध घातले असले तरी, वाढलेल्या किमतींमुळे रशियाचा नफा वाढतो आणि तोच पैसा ते त्यांच्या युद्ध यंत्रणेसाठी वापरू शकतात. थोडक्यात, मध्य पूर्वेतील अस्थिरता रशियासाठी ‘लॉटरी’ ठरते.
दुसरा देश जो या युद्धातून फायदा मिळवतोय तो म्हणजे स्वतः अमेरिका. आता तुम्ही म्हणाल, अमेरिका तर युद्धात सहभागी आहे, मग त्यांचा फायदा कसा? खरतर अमेरिकेची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर त्यांच्या ‘Military Industrial Complex’ वर अवलंबून आहे. इराणच्या भीतीमुळे सौदी अरेबिया, युएई आणि इस्रायल यांसारखे देश स्वतःच्या संरक्षणासाठी अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर्सची शस्त्रे खरेदी करत आहेत. नुकत्याच आलेल्या रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेने सौदी अरेबियाला मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे आणि बंकर्सची विक्री केली आहे. जेव्हा जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा अमेरिकन शस्त्रास्त्रांची मागणी वाढते. लॉकहीड मार्टिन, बोईंग आणि रेथियॉन यांसारख्या अमेरिकन कंपन्यांचे शेअर्स युद्ध सुरू होताच वधारतात. म्हणजेच, रणांगणावर कोणाचाही विजय होवो, अमेरिकन कंपन्यांच्या तिजोऱ्या मात्र नक्कीच भरतात.
तिसरा महत्त्वाचा खेळाडू आहे चीन. चीनची रणनीती खूप वेगळी आहे. जेव्हा अमेरिका युद्धात व्यस्त असते, तेव्हा चीनला जगाच्या इतर भागात आपला प्रभाव वाढवण्याची संधी मिळते. इराणवर निर्बंध असल्यामुळे इराण आपले तेल चोरून किंवा सवलतीच्या दरात चीनला विकतो, अशा बातम्या येत असतात. युद्धाच्या काळात जेव्हा इतर जगाला महाग तेल मिळते, तेव्हा चीन इराणकडून स्वस्तात तेल खरेदी करून आपली अर्थव्यवस्था मजबूत करतो. अमेरिका आणि इराणच्या वादात चीन स्वतःला एक ‘शांतता दूत’ म्हणून सादर करतो. मध्य पूर्वेतील मुस्लिम देशांना आपल्याकडे खेचण्यासाठी चीन या संधीचा फायदा घेतो. अमेरिकेचा प्रभाव कमी होणे हे चीनच्या जागतिक हिताचे आहे.
या युद्धामुळे नैसर्गिक वायूच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत. इराणकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गॅस साठा आहे. युद्धामुळे इराणचा पुरवठा विस्कळीत झाला की, त्याचा थेट फायदा कतार आणि अमेरिकेतील गॅस कंपन्यांना होतो. युरोप, जो आधीच रशियन गॅसपासून तुटला आहे, तो आता पूर्णपणे कतार आणि अमेरिकेवर अवलंबून राहतो. यामुळे कतारसारख्या छोट्या देशाची अर्थव्यवस्था प्रचंड वेगाने वाढत असते.
आता प्रश्न येतो, या देशांचा फायदा होत असेल तर भारताचे काय? भारत आपल्या गरजेच्या 60% तेल आयात करतो. तेलाच्या किमतीत 1 डॉलरची वाढ झाली तरी भारताचे आयात बिल हजारो कोटींनी वाढते. यामुळे आपला रुपया कमकुवत होतो आणि महागाई वाढते. भारताचे इराणसोबतचे व्यापारी संबंध आणि चाबहार बंदर प्रकल्पही धोक्यात आले आहे. म्हणजेच, हे युद्ध भारतासाठी केवळ आर्थिक संकट घेऊन येते. युद्धाच्या या खेळात सामान्य जनता होरपळली जाते, पण काही देश आणि बड्या कंपन्या मात्र त्यातून नफा कमावत असतात. रशियाला महागड्या तेलाचा फायदा होतो, अमेरिकेला शस्त्रविक्रीचा, तर चीनला आपली जागतिक पकड मजबूत करण्याची संधी मिळते. या युद्धामुळे जगाचा नकाशा बदलेल का? जे देश आधीच पॉवरफुल आहेत ते अधिक मजबूत होतील का? याकडेही जगाचे लक्ष लागले आहे.




