वानखेडेवर आरसीबीकडून १८ धावांनी पराभव; चेंडूशी छेडछाड आणि वेळकाढूपणा केल्यामुळे मॅच रेफरी कारवाई करण्याची शक्यता
आयपीएल २०२६ च्या हंगामात पाचवेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सची गाडी रुळावरून घसरली आहे. सलामीचा सामना जिंकल्यानंतर चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या, मात्र रविवारी वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) मुंबईला त्यांच्याच घरात १८ धावांनी धूळ चारली. मुंबईचा हा सलग तिसरा पराभव ठरला असला, तरी सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे मुंबईचा ‘फिनिशर’ टिम डेविड याच्या वर्तणुकीची. सामन्यात आरसीबीची फलंदाजी सुरू असताना १८ व्या षटकात टिम डेविडने केलेल्या एका कृत्यामुळे त्याच्यावर आता आयपीएलच्या शिस्तभंगाची कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
नेमकी घटना घडली ती १८ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर. चेंडूचा आकार (Shape) बदलल्याचा संशय घेत टिम डेविडने तो स्वतःहून तपासण्यास सुरुवात केली. खरं तर, चेंडूची तपासणी करणे किंवा तो बदलण्याचा निर्णय घेणे हा सर्वस्वी पंच किंवा अंपायर्सचा अधिकार असतो. अंपायरनी डेविडला वारंवार हटकले आणि चेंडू मागितला, मात्र डेविडने त्यांच्या सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत चेंडूची तपासणी सुरूच ठेवली. या वादामुळे मैदानावरील वातावरण काही काळ तापले होते आणि अंपायरना डेविडवर ओरडावे लागले. या सर्व प्रकारामुळे सामन्याचा अमूल्य वेळ वाया गेल्याने पंच प्रचंड संतापलेले दिसले.
टिम डेविडचे हे कृत्य आयपीएलच्या ‘कोड ऑफ कंडक्ट’ मधील कलम २.१०.७ (वेळकाढूपणा आणि खेळाच्या नियमांचे उल्लंघन) अंतर्गत येते. त्याने १६ चेंडूत ३४ धावांची नाबाद खेळी करून मुंबईला विजयाजवळ नेण्याचा प्रयत्न केला खरा, पण मैदानातील त्याच्या या अरेरावीमुळे आता मॅच रेफरी त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत मिळत आहेत. एका बाजूला मुंबईची कामगिरी खालावत असतानाच, महत्त्वाच्या खेळाडूवर अशा प्रकारची कारवाई झाल्यास संघाच्या अडचणीत अधिक भर पडू शकते. आता मॅच रेफरी यावर काय अंतिम निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




