स्टब्सला रोखलं मग हार्दिकला सवलत का? २४ तासांत बदललेल्या नियमांमुळे स्पर्धेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह
‘नियम सर्वांसाठी समान’ हे खेळाचे ब्रीदवाक्य असले, तरी आयपीएल २०२६ च्या हंगामात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. एकाच चुकीसाठी दोन वेगवेगळ्या सामन्यांत पंचांनी घेतलेल्या परस्परविरोधी निर्णयांमुळे सोशल मीडियावर वादाचे मोहोळ उठले आहे. विशेषतः मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) सामन्यात घडलेल्या एका प्रकाराने ‘फोर्थ अंपायर’च्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अवघ्या २४ तासांपूर्वी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात जो नियम कडकपणे राबवला गेला, तोच नियम मुंबईच्या सामन्यात का धाब्यावर बसवला गेला, असा संतप्त सवाल क्रिकेटप्रेमी विचारत आहेत.
या वादाचे मूळ ‘ग्लोव्हज’ बदलण्याच्या नियमात दडलेले आहे. चेन्नईत झालेल्या दिल्ली विरुद्ध चेन्नई सामन्यात, फलंदाज ट्रिस्टन स्टब्सला हाताला घाम आल्यामुळे बॅटवर पकड मिळवणे कठीण जात होते. १९ व्या षटकादरम्यान त्याने नवीन ग्लोव्हज मागवले, मात्र चौथ्या पंचांनी त्याला कडक शब्दांत नकार दिला. या निर्णयामुळे दिल्लीचा डगआऊट आणि कोच यांच्यात तीव्र नाराजी पसरली होती. मात्र, बरोबर २४ तासांनंतर वानखेडे स्टेडियमवर वेगळेच दृश्य दिसले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या षटक सुरू असतानाच आरामात आपले ग्लोव्हज बदलताना दिसला, परंतु यावेळी चौथ्या पंचांनी किंवा मैदानावरील पंचांनी त्याला साधी हटकण्याची तसदीही घेतली नाही.
क्रिकेटच्या अधिकृत नियमानुसार, षटक सुरू असताना केवळ ग्लोव्हज फाटले तरच पंचांच्या परवानगीने ते बदलता येतात; केवळ घामामुळे किंवा सोयीसाठी षटकाच्या मध्ये वेळ वाया घालवून ग्लोव्हज बदलण्यास मनाई आहे. दिल्लीच्या खेळाडूला नियमाचा बडगा दाखवणारे पंच हार्दिक पंड्याच्या बाबतीत गप्प का होते? एका संघाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पंचांच्या या भेदभावपूर्ण निर्णयामुळे आयपीएलच्या निष्पक्षतेवर डाग लागत असल्याची चर्चा असून, बीसीसीआयने या तांत्रिक विसंगतीवर स्पष्टीकरण देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.




