अजिंक्य रहाणेही चक्रावला! विजयाच्या जल्लोषात ‘टॉस फिक्सिंग’च्या आरोपांनी सोशल मीडियावर खळबळ
IPL 2026 च्या दुसऱ्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत विजयाचे खाते उघडले खरे, पण या विजयापेक्षा सध्या मैदानाबाहेरील वादाचीच जास्त चर्चा होत आहे. २२१ धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करून मुंबईने इतिहास रचला असला, तरी सामन्याच्या सुरुवातीला झालेल्या ‘टॉस’ने संशयाचे भूत उभे केले आहे. नाणेफेकीच्या वेळी हार्दिक पांड्याने टॉस उडवला, रहाणेने कॉल दिला, पण नाणे जमिनीवर पडल्यानंतर कॅमेऱ्याने नक्की काय पडले हे दाखवलेच नाही; थेट मुंबईचा विजय जाहीर झाला. या प्रकारामुळे क्रिकेट चाहत्यांनी संताप व्यक्त केला असून, “असे फक्त मुंबईच्याच बाबतीत का घडते?” असा सवाल विचारत ‘टॉस फिक्सिंग’चे आरोप सुरू झाले आहेत.
केवळ टॉसच नाही, तर वानखेडेच्या खेळपट्टीनेही सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. खुद्द केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे खेळपट्टीवरील गवत पाहून अवाक झाला होता. “मी इतकी वर्षे इथे खेळतोय, पण असं पीच कधीच पाहिलं नाही,” अशी प्रतिक्रिया त्याने दिली. दरम्यान, मैदानात कोलकात्याने २२० धावांचा डोंगर उभा केला होता, मात्र मुंबईच्या फलंदाजांनी २० व्या ओव्हरमध्ये हे लक्ष्य पार करत ६ विकेट्सने दिमाखदार विजय मिळवला. गेली १३ वर्षे पहिला सामना हरण्याची मुंबईची परंपरा अखेर या वादाच्या सावलीत मोडली गेली आहे.




