मुंबईकरांसाठी आणखी एक महत्त्वाची पायाभूत सुविधा आजपासून सुरू होत आहे. मेट्रो 9 मार्गिका दहिसर ते काशिगाव या पट्ट्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होत असून, या मार्गामुळे मीरा-भाईंदर परिसरातील दैनंदिन प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.
या नव्या मार्गिकेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण आज मोठ्या उत्साहात होत आहे.
मुंबईत आधीच सुरू असलेल्या विविध मेट्रो मार्गांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मेट्रो 9 कडेही प्रवाशांचे लक्ष लागले आहे. नव्या मार्गिकेसाठी मेट्रो स्थानके आणि गाड्यांना आकर्षक सजावट करण्यात आली असून, प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
याच दिवशी ठाणे–बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पालाही प्रारंभ होणार असल्याने मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल अपेक्षित आहे.




