ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी संघटनेची कंबर मोडली; ताहिर अनवरच्या निधनाने जैश-ए-मोहम्मदमध्ये खळबळ, भारतीय यंत्रणा हायअलर्टवर
सध्या बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर २’ हा चित्रपट १००० कोटींची कमाई करत असतानाच, प्रत्यक्ष आयुष्यातही भारताच्या शत्रूंना धडा शिकवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. कुख्यात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचा मोठा भाऊ मोहम्मद ताहिर अनवर याचा पाकिस्तानात संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, अनवरच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. जैशच्या दहशतवादी कारवायांमध्ये ताहिर अनवरची भूमिका अत्यंत कळीची होती आणि त्याच्या जाण्याने या संघटनेला मोठे खिंडार पडले आहे.
या घटनेचे धागेदोरे भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’शी जोडले जात आहेत. गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्येनंतर, ५-६ मे च्या रात्री भारतीय सैन्याने सीमापार घुसून ९ दहशतवादी ठिकाणांवर जोरदार प्रहार केला होता. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले होते, ज्यात मसूद अजहरच्या कुटुंबातील १० पैकी ४ सदस्यांचा समावेश होता. या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच आता ताहिर अनवरचा अंत झाला आहे. पाकिस्तानच्या सोशल मीडियावर त्याच्या निधनाचे मेसेज व्हायरल होत असून, बहावलपूर येथील जैशच्या मुख्यालयात त्याचा दफनविधी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
विशेष म्हणजे, ‘धुरंधर’ चित्रपटात ज्याप्रमाणे भारतीय हेर पाकिस्तानात घुसून शत्रूंचा खात्मा करतात, तशीच काहीशी परिस्थिती सध्या पाकिस्तानात पाहायला मिळत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर जैशने आपली महिला विंग ‘जमात-उन-मोमिनत’ सुरू करून अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एकामागून एक म्होरके धारातीर्थी पडत असल्याने या दहशतवादी नेटवर्कमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या मोठ्या घडामोडीनंतर भारतीय सीमा आणि गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे सतर्क (Alert) झाल्या आहेत.




