“मोठी नावं समोर येतील, मला माहिती आहे पण…”; नार्को आणि ब्रेन मॅपिंग चाचणीनंतर तपासाला वेग
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या २० ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या निर्घृण हत्येचे गूढ आता उलगडण्याच्या अंतिम टप्प्यात आले आहे. तब्बल दोन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंडे कुटुंबासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती संशयितांचे ‘नार्को टेस्ट’ आणि ‘ब्रेन मॅपिंग’ अहवाल आले आहेत. या तांत्रिक पुराव्यांनी प्रकरणाला पूर्णपणे नवे वळण दिले असून, यामुळे परळीतील अनेक बड्या धेंडांचे धाबे दणाणले आहेत. सुरुवातीला हा केवळ अपघात असल्याचा संशय होता, मात्र कुटुंबियांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि राजकीय दबावामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली होती.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणावर भाष्य करताना अत्यंत स्फोटक विधान केले आहे. “महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास आता निर्णायक वळणावर आहे. नार्को आणि ब्रेन मॅपिंगच्या अहवालातून अशी काही धक्कादायक आणि मोठी नावे समोर येणार आहेत की, ज्यामुळे संपूर्ण परळी हादरून जाईल,” असा दावा त्यांनी बीड येथे पत्रकारांशी बोलताना केला. विशेष म्हणजे, आपल्याला यातील गुन्हेगारांची नावे माहिती आहेत, परंतु कायदेशीर प्रक्रियेत आणि पोलीस तपासात अडथळा येऊ नये म्हणून आपण सध्या ती उघड करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री स्तरावरून या प्रकरणावर लक्ष ठेवले जात असून एसआयटी आता हे अहवाल न्यायालयात सादर करणार आहे. महादेव मुंडे यांच्या मृत्यूमागे राजकीय लागेबांधे आणि पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप सुरुवातीपासूनच केला जात होता. आता या वैज्ञानिक चाचण्यांचे अहवाल नेमके कोणाचे ‘पितळ उघडे’ पाडतात आणि परळीतील कोणत्या बड्या नेत्यांची किंवा व्यक्तींची नावे यात समोर येतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. हा तपास पूर्ण झाल्यावर परळीच्या राजकारणात मोठे भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




