“लढाई जिंकली, आता उद्योजक घडवण्याची वेळ” जरांगे पाटील यांचे वक्तव्य
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jaran ge Patil) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अलीकडेच त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांच्याभोवती राजकीय वातावरण तापले होते. आता मराठा बिझनेस कॉन्क्लेव्ह 2025 च्या उद्घाटनासाठी ते मुंबईत दाखल झाले असून या कार्यक्रमाला ते मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मुंबईत पोहोचल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारने काही महत्त्वाच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत आणि उर्वरित मागण्याही निवडणूक प्रक्रियेअंती पूर्ण होतील, असा त्यांचा विश्वास आहे. धमक्या येत असल्या तरी त्या भीक घालत नाहीत, उलट महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा त्यांच्या पाठीशी उभा असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फार रस न घेण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. मात्र, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना राजकीय पातळीवर उत्तर देणार असल्याचा ठाम इशारा त्यांनी दिला. “ज्यांनी आमच्या हक्कांवर अडथळे आणले, त्यांना आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
मराठा बिझनेस कॉन्क्लेव्हबाबत बोलताना ते म्हणाले की, आता मराठा तरुणांनी केवळ लढाईच नाही तर उद्योजकतेतही पुढे यायला हवे. “मी संदेश द्यायला आलो नाही, मी घडलेल्या उद्योजकांकडून संदेश घेऊन जाणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
काही महिन्यांपूर्वी मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या त्यांच्या आंदोलनामुळे महानगर अक्षरशः ठप्प झाले होते. सरकारने त्यानंतर तातडीने जीआर काढून मराठा आरक्षणावर निर्णय घेतला. मात्र OBC नेत्यांनी या निर्णयाला विरोध केला होता आणि त्यात छगन भुजबळही आघाडीवर होते. हा सर्व संघर्ष मागे सारून जरांगे पाटील आता मराठा समाजाच्या आर्थिक आणि व्यावसायिक उन्नतीवर भर देणार असल्याचे दिसते.




