मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत थरकाप उडवणारा आरोप केला आहे. आपल्या हत्येचा कट रचल्याची तक्रार त्यांनी जालना पोलिसांकडे दिली असून, या कटामागे राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) असल्याचा त्यांनी दावा केला आहे.
जरांगे म्हणाले की, बीड (Beed) आणि जालना जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा कट रचण्यात आला. बीडमधील एक कार्यकर्ता कांचन पाटील हा धनंजय मुंडेंचा जवळचा माणूस असल्याचे सांगून त्यांनी या प्रकरणात त्याचाही सहभाग असल्याचे आरोप केले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, छत्रपती संभाजीनगरजवळ धनंजय मुंडे आणि दोन आरोपींची भेट झाली. त्या भेटीत “जरांगे यांना गोळ्या झाडून ठार मारायचे” असे निर्देश देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. एवढेच नव्हे तर त्यांच्या वाहनाला अपघातासारखे दाखवून धडक देण्याची योजना आखण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
जरांगे पुढे म्हणाले, “भाऊबीजेच्या दिवशी अडीच कोटी रुपयांची डील ठरली होती. आरोपी म्हणाले होते, ‘जुनी गाडी द्या, मी गाडीनेच ठोकतो.’” त्यांनी संतप्त शब्दात म्हटले की, “घातपात करून माणूस मोठा होत नाही. धनंजय मुंडेंनी असे नपुंसक चाळे न करता थेट समोर यावे.” या गंभीर आरोपांनंतर राज्य राजकारणात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत चौकशी सुरू केली असल्याचे समजते.




