नार्को टेस्टची तयारी व्यक्त; मराठा आरक्षण प्रक्रिया, शिंदे समिती आणि सरकारवरही टीकेची झोड
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नवी मुंबईत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. “माझा घातपात करण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी दिल्याचा आरोप पोलिसांच्या ताब्यातील आरोपींनी केला आहे,” असा दावा त्यांनी माध्यमांसमोर मांडला.
जरांगे म्हणाले की, “मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. माझी आणि धनंजय मुंडे दोघांचीही नार्को टेस्ट घ्या. त्यांनी माझ्यावर वाहन चालवून हल्ला करण्याची योजना आखली आहे.” त्याचबरोबर, “अशा गंभीर आरोपांवर जालन्यातील पोलीस वा गृहमंत्रालय चौकशी का करत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. “फडणवीस पूर्वीसारखे राहिले नाहीत. ते क्रूर लोकांना आधार देत आहेत. त्यांनी सामान्य जनतेसाठी उभं राहायला हवं,” असे ते म्हणाले.
मराठा आरक्षण प्रक्रियेबाबतही त्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली. शिंदे समिती नोंदी शोधतच नाही, असा आरोप त्यांनी केला. “कुणबी नोंदी सापडलेल्या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यास अधिकारी अडथळा करतात. सातारा–पुणे–औंध संस्थानचे जीआर त्वरित काढा, नाहीतर तीव्र आंदोलन उभं करू,” असा इशारा त्यांनी दिला.
सारथीच्या योजनांवर सरकारने ब्रेक लावल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही आणि शेतकऱ्यांचीही दुरवस्था सुरूच आहे. “मदत न दिल्यास शेतकऱ्यांनी मतदानातून सरकारला धडा शिकवावा,” असे ते म्हणाले.
2029 च्या निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा तोटा होऊ शकतो, असा दावा करत त्यांनी म्हटले की, “घातपात करणाऱ्यांना पाठिंबा देणारे राजकारणी जनतेच्या लक्षात येत आहेत.” अनेक भाजप आमदार व मंत्र्यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचेही त्यांनी सांगितले.




