चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. सुपरहिट चित्रपट मंजुम्मेल बॉइज चे दिग्दर्शक चिदंबरम एस पोडुवल यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी एर्नाकुलम साऊथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी अधिकृतपणे तपास सुरू केला आहे.
तक्रारीनुसार, 2022 मध्ये कोचीतील एलमकुलम परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये ही कथित घटना घडल्याचा आरोप आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक तिच्या फ्लॅटमध्ये जबरदस्तीने शिरले आणि तिच्याशी असभ्य वर्तन करत लैंगिक अत्याचार केला, असा दावा तिने केला आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी महिलेचा सविस्तर जबाब नोंदवून संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 74 आणि 75 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित कलमे महिलेच्या विनयभंग आणि लैंगिक छळाशी संबंधित आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, कायदेशीर प्रक्रियेनुसार दिग्दर्शकांना नोटीस बजावण्यात येणार असून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले जाईल. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल. दरम्यान, चिदंबरम एस पोडुवल यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.




