ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचाराने डोके वर काढले आहे. एका भीषण रॉकेट हल्ल्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याने परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. काही काळ शांत असलेला हा प्रदेश या घटनेनंतर पुन्हा अस्थिर झाला आहे.
माहितीनुसार, मोइरांग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ट्रोंगलाओबी अवांग लेइकाई भागात सोमवारी मध्यरात्रीनंतर सुमारे 1 वाजता हल्ला झाला. कथितपणे कुकी गटातील काही व्यक्तींनी एका घरावर रॉकेट डागले. या भीषण स्फोटात 5 वर्षांच्या मुलाचा आणि 5 महिन्यांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या आईची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर घाटी भागातील अनेक जिल्ह्यांत तणाव वाढला आहे. संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले असून त्यांनी निषेध आंदोलन सुरू केले. विष्णूपूर जिल्हा येथे आंदोलकांनी दोन टँकर आणि लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला आग लावली. तसेच लोकांनी मोइरांग पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणावर जमाव करून हल्लेखोरांविरुद्ध तात्काळ कारवाईची मागणी केली.
दरम्यान, काही आंदोलकांनी चुराचांदपूर सीमेजवळील सीआरपीएफ छावणीवरही हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधूर आणि गोळीबाराचा वापर केला. या कारवाईत सुमारे 19 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच एका व्यक्तीच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे.
परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने विष्णूपूर जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. तसेच अफवा पसरू नयेत यासाठी पाच जिल्ह्यांमध्ये तीन दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
सध्या संपूर्ण भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाने केले असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.




