महायुती सरकारमध्ये अजून एका मंत्र्यांची विकेट पडणार!
राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे ३० वर्षांपूर्वीच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात अडचणीत आले आहेत. शासकीय कोट्यातील १० टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षे आणि १० हजार दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली आहे. त्यानंतर आज (दि.17) जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. तसेच त्यांंना त्यामुळे कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याचे निश्चित झाले आहे. अंजली दिघोळे यांनी कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करावे यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे.
कोकाटे कॅबिनेट मंत्री आहेत त्यामुळे याचा विचार करावा अशी विनंती कोकाटे यांच्या वकिलांतर्फे न्यायालयात करण्यात आली. त्यावेळी न्यायालायाने स्पष्ट केले की, न्यायालयापुढे सर्व लोकं समान आहेत मग तो सामान्य नागरिक असो, मंत्री असो किंवा कोणत्याही व्यवसायामधला व्यक्ती असो असे सांगितले. तसेच स्वतः कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी शरण जावं किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे निर्देशही न्यायालायने दिले आहेत. त्यामुळे आता कोकाटे बंधू स्वतःहून शरण येतात की, त्यांना पोलिसांकडून अटक केली जाते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




