कोकणातील राधिकाचा साधा–सुंदर लूक, मनाला भिडणारा गोड आवाज आणि व्हायरल व्हिडीओने तरुणाईचं मन जिंकले; लवकरच मराठी चित्रपटात पहिलं पार्श्वगायन
एका रात्रीत स्टार बनलेली राधिका भिडे
सोशल मीडियावर सध्या फक्त एकाच गाण्याची धूम आहे – ‘मन धावतंय तुझ्याच मागे’. अनेकांच्या स्टेटसपासून रील्सपर्यंत हे गाणं झपाटून टाकत आहे. या गाण्याचा गोड, निरागस आवाज सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आणि त्या आवाजाची मालकिण आहे राधिका भिडे, कोकणातील रत्नागिरीची.
राधिकाने एमएक्स प्लेअरवरील ‘आय पॉप स्टार’ या शोमध्ये हे गाणे सादर केले आणि तिच्या त्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला. साधेपणातली सुंदरता— नऊवारी साडी, कपाळावर चंद्रकोर, अगदी मराठमोळा लूक—यामुळे राधिकाचा लूकही तितकाच चर्चेत आला.
गाण्याने बदलले आयुष्य
या एका गाण्याने राधिकाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिच्या गायनातील नैसर्गिकता, टवटवीत भाव आणि मनाला भिडणारा आवाज यामुळे ती तरुणाईची नवी फेव्हरेट बनली आहे. तिची बहीण शमिका भिडे आधीच प्रसिद्ध गायिका असली तरी राधिकाने स्वतःच्या शैलीत मोठं नाव मिळवलं आहे.
पहिला मोठा प्रोजेक्ट – ‘उत्तर’ चित्रपटासाठी गाणं
व्हायरल लोकप्रियतेनंतर राधिकाला अनेक ऑफर्स येऊ लागल्या आहेत. तिच्या पहिल्या पार्श्वगायनाची सुरुवातही ठरली आहे. ती लवकरच ‘उत्तर’ या मराठी चित्रपटात ‘हो आई’ हे भावपूर्ण गाणे गाणार आहे. आई–मुलाच्या नात्यातील उब आणि आपुलकी सहजपणे व्यक्त करणारे हे गाणे प्रेक्षकांना भावेल अशी चर्चा आहे. या चित्रपटात रेणुका शहाणे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.




