spot_img

Malegaon Mayor Election 2026 : मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टीचा झेंडा; शेख नसरीन बानो महापौरपदी

spot_img

25 मतांच्या मोठ्या फरकाने शिवसेनेचा पराभव; उपमहापौरपदी समाजवादी पार्टीचे शान-ए-हिंद

मालेगाव महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद यांनी दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. थेट झालेल्या या लढतीत शेख नसरीन बानो यांना एकूण 43 मते मिळाली, तर शिवसेनेच्या उमेदवार लता सखाराम घोडके यांना केवळ 18 मतांवर समाधान मानावे लागले. परिणामी, 25 मतांच्या स्पष्ट फरकाने इस्लाम पार्टीने महापौरपद पटकावले.

आज जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी महापालिका आयुक्त रवींद्र जाधव उपस्थित होते. सभेची सुरुवात राष्ट्रगीताने झाली असून दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

महापौरपदासाठी दाखल झालेल्या पाच नामनिर्देशन अर्जांपैकी तपासणीनंतर इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद, शेख ताहेरा शेख रशीद आणि शिवसेनेच्या लता घोडके यांचे अर्ज वैध ठरले. माघारीच्या मुदतीत शेख ताहेरा यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे शेख नसरीन बानो आणि लता घोडके यांच्यात थेट सामना झाला.

या निवडणुकीत इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांची आघाडी निर्णायक ठरली. भाजप आणि एमआयएमने तटस्थ भूमिका घेतल्याचा फायदा इस्लाम पार्टीला झाला. मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत शेख नसरीन बानो यांना समाजवादी पार्टी व काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे स्पष्ट बहुमत मिळाले.

दरम्यान, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीचे शान-ए-हिंद यांनी बाजी मारली. त्यांना 43 मते मिळाली, तर शिवसेनेचे ॲड. निलेश काकडे यांना 18 मतांवरच समाधान मानावे लागले. इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या एकत्रित पाठिंब्यामुळे शान-ए-हिंद यांचा विजय निश्चित झाला.

निवडणुकीपूर्वी सत्ताधारी आघाडीतील नगरसेवक लक्झरी बसमधून एकत्रितपणे महापालिकेत दाखल झाले. महिला नगरसेविका काळ्या बुरख्यावर हिरवे फेटे, तर पुरुष नगरसेवक हिरवे फेटे व इस्लाम पार्टीचा गमछा परिधान करून सभागृहात आल्याने वातावरणात राजकीय रंगत निर्माण झाली. दुसरीकडे, शिवसेनेचे नगरसेवक भगव्या पोशाखात दाखल झाले होते.

संभाव्य तणाव लक्षात घेता महापालिका परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रवेशद्वारावर प्रत्येक सदस्याची तपासणी करण्यात आली, त्यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ