तीन वर्षांचा कोटींचा करार; ‘मिस्ट्री मॅन’सोबत दिसल्यानं रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण.
पन्नाशीनंतरही आपल्या फिटनेस आणि स्टाईलने चाहत्यांना भुरळ घालणारी मलायका अरोरा सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच आता तिच्या प्रॉपर्टी डीलमुळेही ती चर्चेचा विषय ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलायकाने मुंबईतील वांद्रे पश्चिम भागात असलेले तिचे आलिशान अपार्टमेंट भाड्याने दिले आहे. हा करार तब्बल तीन वर्षांसाठी करण्यात आला असून एकूण व्यवहाराची किंमत सुमारे 1.17 कोटी रुपये आहे. सुरुवातीला दरमहा 3.10 लाख रुपये भाडे ठरवण्यात आले असून दरवर्षी 5 टक्क्यांनी वाढ होणार आहे.
हे घर ‘विदा’ या इमारतीत असून कार्टर रोडजवळ स्थित आहे. अधिकृत कागदपत्रांनुसार, हे अपार्टमेंट मलायका अरोरा यांना भाड्याने देण्यात आले असून त्यांनी 20 लाख रुपयांची सिक्युरिटी डिपॉझिट दिली आहे.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिने देखील पाच वर्षांसाठी एक बंगला भाड्याने दिल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवहाराची किंमत सुमारे 4.14 कोटी रुपये असून दरमहा 6.5 लाख रुपये भाडे ठरवण्यात आले आहे.
मलायका अरोरा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. ती वारंवार एका ‘मिस्ट्री मॅन’सोबत दिसत असल्याने तिच्या नव्या नात्याबाबत चर्चा रंगल्या आहेत. हा व्यक्ती हिरे व्यापारी हर्ष मेहता असल्याची चर्चा आहे. दोघे अलीकडे राजस्थानमधील एका मंदिरात एकत्र दिसल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
याआधी मलायका अर्जुन कपूर यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, त्यांचे ब्रेकअप झाल्यानंतर आता तिच्या नव्या नात्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.




