spot_img

Makar Sankaranti 2026 : संक्रांतीच्या पतंगोत्सवाची अशी आहे कहाणी

spot_img

चीनपासून भारतापर्यंत पतंगाचा प्रवास, युद्ध, विज्ञान आणि परंपरेशी असलेलं नातं

इंग्रजी नववर्षातील पहिला मोठा सण म्हणून मकर संक्रांतीकडे पाहिलं जातं. या सणाचं खास आकर्षण म्हणजे पतंगबाजी. संक्रांतीच्या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या नजरा आकाशाकडे लागलेल्या असतात. रंगीबेरंगी पतंगांनी भरलेलं आकाश, एकमेकांशी चाललेली पतंग कापण्याची चुरस आणि काही ठिकाणी होणाऱ्या स्पर्धा यामुळे वातावरण उत्साहाने भारलेलं असतं.

लाल, पिवळे, निळे, गुलाबी अशा विविध रंगांचे पतंग आकाशात झेपावताना दिसतात. मात्र हा खेळ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून त्यामागे एक समृद्ध इतिहास दडलेला आहे. इतिहासकारांच्या मते पतंगाचा उगम चीनमध्ये झाला. इसवी सनपूर्व २०६ मध्ये हान सिन नावाच्या चिनी सेनानीने युद्धात पतंगाचा वापर केल्याचा उल्लेख आढळतो. चीनमध्ये आजही नवव्या महिन्याच्या नवव्या दिवशी ‘पतंग दिन’ साजरा केला जातो.

पतंगाचा वापर केवळ खेळापुरताच नव्हता. १७५२ साली प्रसिद्ध शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलिन यांनी वीज ही विद्युत शक्तीमुळेच निर्माण होते, हे सिद्ध करण्यासाठी पतंगाचा प्रयोग केला होता. याशिवाय वाऱ्याची दिशा, हवामानाचा अंदाज आणि रेडिओ लहरी यांसारख्या संशोधनातही पतंग महत्त्वाचं साधन ठरला.

भारतात पतंग नेमका कधी आला, याचा ठोस इतिहास नसला तरी कवी आणि संतांच्या रचनांमध्ये त्याचा उल्लेख सापडतो. जुन्या काळात संदेश पोहोचवण्यासाठीही पतंगाचा उपयोग केला जात होता. आज पतंग संक्रांतीचा अविभाज्य भाग बनला असला, तरी त्यामागे विज्ञान, युद्ध आणि संस्कृतीचा दीर्घ प्रवास दडलेला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ