बिग बॉस मराठीचा सहावा सिझन सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. कधी स्पर्धकांच्या वादामुळे, तर कधी टास्कदरम्यान झालेल्या गोंधळामुळे हा शो चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. आतापर्यंत दोन स्पर्धकांचे एलिमिनेशन झाले असले, तरी अलीकडेच बिग बॉसने एक कठोर आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे.
स्पर्धक दिव्या शिंदे हिला कोणत्याही एलिमिनेशन प्रक्रियेशिवाय थेट घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. एका टास्कदरम्यान दिलेल्या गंभीर आणि आक्षेपार्ह धमकीमुळे बिग बॉसने तिची घरातून हकालपट्टी केली.
अलीकडे घरात देण्यात आलेल्या एका टास्कमध्ये, घरात राहण्यास अपात्र वाटणाऱ्या स्पर्धकाच्या चेहऱ्यावर लाल रंगाने फुली मारायची होती. या टास्कमध्ये तन्वीने दिव्याचे नाव घेतले आणि ती घरासाठी योग्य नसल्याचे मत मांडले. यानंतर दिव्या प्रचंड संतापली.
रागाच्या भरात दिव्याने काही स्पर्धकांविषयी अत्यंत गंभीर विधान करत, अप्रत्यक्षपणे जीवे मारण्याची धमकी दिली. तिने केलेल्या वक्तव्यामुळे घरातील वातावरण अक्षरशः तणावपूर्ण झाले.
दिव्याच्या वक्तव्यानंतर बिग बॉसने तात्काळ हस्तक्षेप करत तिला कडक शब्दांत समज दिली. त्यानंतर तिला कन्फेशन रूममध्ये बोलावण्यात आले, जिथे तिने बिग बॉसची माफी मागितली. मात्र, घरातील सदस्यांची माफी मागण्यास तिने स्पष्ट नकार दिला.
याच भूमिकेमुळे आणि नियमभंगाच्या गंभीरतेमुळे बिग बॉसने दिव्या शिंदेची घरातून थेट हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर घरातील समीकरणे बदलणार हे निश्चित आहे.




