‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात !
महेश मांजरेकर यांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ (punha shivaji raje bhosale) या चित्रपटावरून नवा वाद उभा राहिला आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दावा दाखल करण्यात आला आहे. दाव्यात बंधनकारक कराराचे उल्लंघन, कॉपीराइटचा भंग आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.दरम्यान, या आरोपांवर महेश मांजरेकरांनी (Mahesh manjrekar) स्पष्टीकरण देत प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप निराधार असल्याचे सांगितले आहे.
“पुन्हा शिवाजीराजे भोसले” चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी म्हटलंय, “पुन्हा शिवाजीराजे भोसले” हा आमचा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कथा नाही, तर ती महाराष्ट्राच्या आत्म्याला स्पर्श करणारी भावना आहे. या चित्रपटाचा कोणत्याही पूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमाशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. हा सिक्वेल, प्रीक्वेल किंवा दुसरा भाग नाही. हा सिनेमा पूर्णपणे स्वतंत्र, मौलिक आणि आमच्या मनातून, आमच्या श्रद्धेतून जन्माला आलेला आहे” असं त्यांनी स्पष्ट केलं.
“आम्ही हे सर्व आमच्या प्रसिद्धी उपक्रमांमधून, माध्यमांमधून आणि संवादांमधून स्पष्टपणे सांगितलं आहे. मराठी प्रेक्षक हे सुजाण, जाणकार आणि संवेदनशील आहेत. इतिहासाविषयी त्यांचं प्रेम आणि अभिमान आम्हालाही प्रेरणा देतो. त्यामुळे प्रेक्षकांची दिशाभूल करण्याचा किंवा चुकीचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न आमच्याकडून कधीच झालेला नाही आणि होणारही नाही. या चित्रपटाच्या कथेत आम्ही एका गहिऱ्या भावनेला आकार दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज 1680 नंतर पुन्हा एकदा या पवित्र महाराष्ट्रभूमीवर अवतरतात. ही केवळ कल्पना नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या अंतःकरणात पेटलेली एक ज्वाला आहे. ‘राजे पुन्हा येतील, आपल्या मातीचा सन्मान पुन्हा प्रस्थापित करतील’ याच भावना, या संकल्पनेतूनच आमच्या चित्रपटाला ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हे नाव मिळालं आहे,” असं मांजरेकर म्हणाले.
याविषयी ते पुढे म्हणाले, “अलीकडे एका निर्मितीसंस्थेनं असा दावा केला आहे की या चित्रपटामुळे त्यांच्या बौद्धिक अधिकाराचं उल्लंघन झालं आहे. मात्र, आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की हे सर्व आरोप पूर्णपणे निराधार, तथ्यहीन आणि चुकीचे आहेत. आमचं कथानक, पात्रं आणि मांडणी ही सर्वस्वी मौलिक आहे.आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नाहीत, ते आमचे प्रेरणास्थान, आमचा अभिमान आणि आमचा श्वास आहेत. त्यांच्या पराक्रमाची गाथा, त्यांच्या विचारांचा वारसा आणि त्यांच्या नेतृत्वाची जाणीव आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आमचं कर्तव्य आणि सौभाग्य आहे.””पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटामागचा आमचा हेतू एकच आहे. शिवरायांचा पराक्रम, त्यांचा आदर्श आणि त्यांचा न्यायप्रिय स्वभाव नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं. हा प्रयत्न कोणाच्याही आडकाठीशिवाय, कुठल्याही भीतीशिवाय आणि संपूर्ण प्रामाणिकपणे सुरू राहील. कारण, शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाहीत ते संपूर्ण हिंदुस्थानाचे दैवत आहेत आणि त्यांच्या कथा सांगण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे,’ अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली आहे.




