वाढती लोकसंख्या, प्रदूषण आणि नियोजनशून्य विकासावर घणाघाती टीका; ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीत स्पष्ट भूमिका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीत अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुंबईच्या सध्याच्या अवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. वाढती लोकसंख्या, भीषण प्रदूषण आणि नियोजनशून्य विकासामुळे मुंबई जगण्यालायक राहिली नसल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं.
“आज घराबाहेर पडताना एक मुंबईकर म्हणून मला लाज वाटते की माझी मुलं या शहरात मोठी होत आहेत,” असं सांगत मांजरेकरांनी एअर क्वालिटी इंडेक्सचा दाखला दिला. सध्याचा AQI 183 असल्याचं नमूद करत, कोणी जर दुसरा पर्याय दिला तर क्षणाचाही विलंब न करता मुंबई सोडण्यास आपण तयार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.
मुंबईची अवस्था क्षमतेपेक्षा अनेक पटीने फुगवलेल्या फुग्यासारखी झाल्याची उपमा देत, सध्याची लोकसंख्या तब्बल २ कोटी ३१ लाखांवर पोहोचल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. “ही मुंबई कधी मोकळी होणार?” असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी प्रदूषणामागे नियोजनशून्य विकास जबाबदार असल्याचा आरोप केला. “आज जे ‘विकास’ म्हणून दाखवलं जात आहे, ती प्रगती नाही तर विनाशाची गती आहे,” असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर टीका केली.
मांजरेकर पुढे म्हणाले की, आता मुंबईत विकासासाठी जागाच उरलेली नाही. कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण धोकादायक पातळीवर गेलं असून, आपण ऑक्सिजनपेक्षा जास्त कार्बन श्वासात घेतोय, अशी गंभीर स्थिती असल्याचं त्यांनी सांगितलं. “जे लोक आधी आले आहेत त्यांना राहू द्या, पण नव्यानं येणाऱ्यांचा ओघ तरी थांबवायला हवा,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. ही मुलाखत केवळ राजकीय चर्चा न राहता, मुंबईच्या भवितव्यावरचा गंभीर इशारा ठरली आहे.




