पाचोरा-भडगावात महायुतीत फूट! शिवसेना-भाजप स्वबळावर लढणार
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात महायुतीच्या एकजुटीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पार्टी (भाजप) यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील महायुतीच्या दृष्टीने पहिला मोठा फटका मानला जात आहे. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी युती न करता स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर, भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनीही तातडीने बैठक घेऊन स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. पाचोरा येथे झालेल्या भाजपच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच पाचोरा-भडगाव मतदारसंघात महायुतीत बेबनाव निर्माण झाला आहे.किशोर पाटील यांनी कोणत्याही पक्षाशी युती न करण्याची ठाम भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, मंगेश चव्हाण यांनीही भाजपच्या ताकदीवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. चव्हाण म्हणाले, “राजकारणात मित्र आणि शत्रू कायमचे नसतात. आजचा मित्र उद्या शत्रू होऊ शकतो, आणि परवा पुन्हा मित्रही होऊ शकतो. किशोर पाटील आणि मी एकाच सरकारमध्ये आहोत, पण त्यांनी सावधपणे बोलावे.
मी त्यांच्यासाठी नेहमीच साथ दिली, पण त्यांनी आमच्याविरोधात कोणतीही तक्रार करू नये.”चव्हाण यांनी पुढे सांगितले की, पक्ष वाढवण्यासाठी जे लोक सोबत येतील, त्यांना सामावून घेतले जाईल. “आम्ही किशोर पाटील यांच्याशी युतीबाबत बोललो होतो, पण त्यांनी नकार दिल्याने आम्हाला स्वतंत्रपणे पुढे जावे लागत आहे,” असे ते म्हणाले. या निर्णयामुळे पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढणार असून, हा वाद केवळ या दोन मतदारसंघांपुरताच मर्यादित आहे. जळगाव जिल्ह्याच्या इतर भागांबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका पक्षनेत्यांनी जाहीर केलेली नाही.चव्हाण यांनी पाटील यांच्यावर गैरसमजातून हा वाद निर्माण झाल्याचा आरोप केला. “आमच्या 20 पैकी 17 कार्यकर्त्यांनी पाटील यांच्यासाठी काम केले आहे. त्यांनी आमच्यावर बंडखोरीचा आरोप करणे चुकीचे आहे. युतीचे दरवाजे नेहमीच खुले आहेत, आणि पाटील यांनी प्रस्ताव दिल्यास पुन्हा चर्चा होऊ शकते,” असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.या घडामोडींमुळे पाचोरा-भडगावातील स्थानिक निवडणुकीत महायुतीच्या एकजुटीला खीळ बसली असून, याचा परिणाम जळगावच्या राजकारणावर कसा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.




