spot_img

Mahayuti Manifesto : मुंबईकरांवर आश्वासनांची बरसात! महायुतीचा महापालिकेसाठी महत्त्वाकांक्षी जाहीरनामा जाहीर

spot_img

मराठी माणसाला पुन्हा मुंबईत स्थान, पाणीपट्टी वाढीला ब्रेक, खड्डेमुक्त रस्ते आणि घरांचे मोठे स्वप्न

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जाहीरनामा आज रविवारी, 11 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला.

निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असताना महायुतीने मुंबईकरांसाठी विविध योजनांचा पाऊस पाडला असून, शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे मांडताना सांगितले की, गेल्या काही वर्षांत मुंबईतील मराठी माणूस उपनगरांकडे ढकलला गेला आहे. त्याला पुन्हा मुंबईत सन्मानाने स्थान मिळवून देण्यासाठी महायुती ठोस पावले उचलणार आहे.

पुनर्विकास प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करत एसआरए, म्हाडा, सेस आणि नॉन-सेस इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्पष्ट निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच दरवर्षी वाढणाऱ्या पाणीपट्टीवर पुढील पाच वर्षे 8 टक्के वाढ न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई खड्डेमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करताना, प्रदूषणमुक्त शहर घडवण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. “फक्त घोषणा करून थांबणार नाही, तर प्रत्येक आश्वासनाची अंमलबजावणी केली जाईल,” असा विश्वास त्यांनी मुंबईकरांना दिला.

मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवण्यासाठी एसआरए आणि क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून सुनियोजित विकास करण्यात येणार असून, सध्या 17 मोठे प्रकल्प राबवले जात आहेत. गिरणी कामगारांसाठी हक्काची घरे देण्याचा शब्द देण्यात आला असून, आतापर्यंत 12 हजार कुटुंबांना घरे देण्यात आली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. या कामात मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबई आणि एमएमआर परिसरात सर्वसामान्यांना परवडणारी, सुरक्षित आणि हक्काची घरे देण्याचे उद्दिष्ट असून, शहरातून हद्दपार झालेल्या मुंबईकरांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प महायुतीने या जाहीरनाम्यातून व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ