ठाण्यात भाजप मंडळ अध्यक्षांचा युतीला विरोध, तर सोलापुरात शिवसेना शिंदे गटाची ५० टक्के जागांची ठाम मागणी
शिवसेना आणि भाजप (BJP) यांच्यातील युती कायम ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात बैठक झाली असली, तरी स्थानिक पातळीवर मात्र या युतीला विरोध उफाळून येताना दिसत आहे. विशेषतः ठाण्यात युतीवरून भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
ठाण्यातील भाजपच्या मंडळ अध्यक्षांनी एकत्र येत “शिवसेनेसह युती नको” अशी ठाम भूमिका घेतली आहे. या संदर्भात त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. याआधीच मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांना निवेदन दिले होते. ठाण्यात युती केल्यास पक्षाला फटका बसू शकतो, अशी भीती पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, शिवसेनेतही ठाण्यात अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. मनोरमा नगरमधील प्रभाग क्रमांक तीनमध्ये स्थानिक उमेदवारालाच संधी मिळावी, अशी ठाम मागणी शिवसेना शाखा प्रमुख देवानंद भगत आणि विक्रांत वायचाळ यांनी केली आहे. या प्रभागात माजी नगरसेवक भूषण भोईर आणि मधुकर पावशे यांना स्थानिक शिवसैनिकांचा आणि नागरिकांचा विरोध आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांना देखील याबाबत स्थानिकांकडून पत्र देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, सोलापूर (Solapur) महापालिका निवडणुकीतही शिवसेना–भाजप युतीची चर्चा जागावाटपावरून अडचणीत आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून थेट ५० टक्के जागांची मागणी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “१०२ पैकी ५१ जागांवर आमचा दावा आहे. युती झाली नाही तरी शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवण्यास सक्षम आहे. सोलापुरातील अनेक प्रभागांमध्ये आमच्याकडे १५ ते २० इच्छुक उमेदवार आहेत.”
राज्य पातळीवर युतीचे निर्णय झाले असले, तरी ठाणे आणि सोलापूरसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये स्थानिक राजकारणामुळे शिवसेना–भाजप युतीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आगामी महापालिका निवडणुकांआधी हे मतभेद मिटणार की आणखी तीव्र होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




