जिल्हा परिषद–पंचायत समिती निकालात राजकीय वारसांचे वर्चस्व ठळक
राज्यातील ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट होऊ लागले आहेत. राज्यातील १२ जिल्हा परिषदांबरोबरच १२५ पंचायत समित्यांचे निकाल जाहीर होत असून, या निवडणुकांत अनेक प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबीयांनी विजय मिळवत आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. पुणे, सोलापूर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत राजकीय वारसांनी बाजी मारल्याचे चित्र आहे.
या निवडणुकांत सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळाली. पुणे, सोलापूर, परभणी आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये विजय-पराजयाचे समीकरण शेवटच्या फेऱ्यांपर्यंत रंगले होते.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली. पारगाव जरकवाडी गटातून त्यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांनी २,१३० मतांची आघाडी घेत निर्णायक विजय मिळवला. दुसरीकडे, पुरंदर तालुक्यात माजी आमदार बापूसाहेब पठारे यांची कन्या रूपाली झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर यश संपादन केले. पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पंचायत समिती सदस्यही विजयी झाल्याने तालुक्यात पक्षाची पकड अधिक घट्ट झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात मानेगाव जिल्हा परिषद गटात लक्षवेधी सामना पाहायला मिळाला. माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांनी भाजपकडून निवडणूक लढवत तब्बल ६,८०० मतांच्या फरकाने प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. हा विजय सोलापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या विजयांपैकी एक मानला जात आहे. याच जिल्ह्यात भाजप नेते राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनीही जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवत राजकारणात यशस्वी एन्ट्री केली आहे.
कोकण पट्ट्यातही राजकीय वारसा पुढे नेणाऱ्या उमेदवारांनी यश मिळवले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघातील असगोली गटातून आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी राखत विजय मिळवला. रायगड जिल्ह्यात आमदार भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनीही प्रतिस्पर्ध्यावर मात करत विजयी मुसंडी मारली आहे.




