spot_img

Maharashtra ZP Election Results 2026 : जिल्हा परिषद–पंचायत समिती निकालात भाजपची सरशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसऱ्या क्रमांकावर घसरण

spot_img

प्रचाराविना झालेल्या निवडणुकीत महायुतीचा दबदबा; बारामतीत मात्र राष्ट्रवादीची ताकद कायम

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत असून सुरुवातीच्या कलांमधून राज्यातील राजकीय चित्र ठळकपणे समोर येत आहे. 12 पैकी सर्व 12 जिल्हा परिषदांचे, तसेच 125 पैकी 106 पंचायत समित्यांचे कल जाहीर झाले आहेत.

या निवडणुकांचा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांनी केला होता. मात्र त्यांच्या निधनानंतर सर्वच पक्षांनी प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निकालांमध्ये कोणता पक्ष आघाडी घेणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

अपेक्षेप्रमाणे भाजपने या निवडणुकांमध्ये वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजप 12 पैकी 7 जिल्हा परिषदांमध्ये आघाडीवर असून 106 पंचायत समित्यांपैकी 40 ठिकाणी भाजपने बाजी मारली आहे.

दिवंगत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेत केवळ एका ठिकाणी तर पंचायत समितीत 20 ठिकाणी आघाडी मिळवता आली आहे. परिणामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे.

दरम्यान, बारामती पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीने आपली पकड कायम ठेवली आहे. 12 पैकी 9 जागांवर राष्ट्रवादी आघाडीवर असून यातील एका जागेवर अजित पवार गटाच्या उमेदवाराचा विजय निश्चित झाला आहे. भाजपला येथे केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जिल्हा परिषदेत तीन जागांवर आघाडी घेत दुसरे स्थान पटकावले आहे. तर पंचायत समितीमध्ये 24 जागांवर आघाडी घेऊन शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.

महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसची कामगिरी मात्र निराशाजनक ठरली आहे. ठाकरे गटाला जिल्हा परिषदेत खातेही उघडता आलेले नाही. पंचायत समितीत केवळ पाच जागांवरच ठाकरे गट आघाडीवर आहे. काँग्रेसने तुलनेने थोडी चांगली कामगिरी करत जिल्हा परिषदेत एका आणि पंचायत समितीत आठ जागांवर आघाडी मिळवली आहे.

एकूणच या निवडणुकांमध्ये महायुतीचे वर्चस्व स्पष्ट झाले असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ