नोव्हेंबरच्या सुरुवातीला राज्यात दणदणीत पाऊस झाल्यानंतर आता महाराष्ट्रात हवामानाचा मोठा बदल जाणवू लागला आहे. सततच्या उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर थंडीची गार झुळूक जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबईत तापमान 20 अंशांच्या खाली सरकलं असून पुढील दोन दिवसांत पारा 18 ते 19 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शहरात आता स्वेटर–जॅकेट बाहेर पडू लागली आहेत.
राज्यातील इतर भागातही थंडीने जोर धरला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढल्याने कमाल तापमानातही हळूहळू घट होत आहे. हवामान विभागानुसार, पुढील 2–3 दिवस राज्यात गारठा वाढतच राहणार असून सोमवारीही थंडी कायम जाणवेल. काही ठिकाणी तापमान 16–17 अंशांवर जाण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये गारठ्याची चरमसीमा
नाशिकमध्ये थंडीने अक्षरशः थैमान घातलं आहे. गेल्या आठवड्यापासून तापमान 10 अंशांच्या आसपास स्थिरावलं असून पुढील आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढेल असा अंदाज आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर धुक्याची चादर पसरली असून गोदावरी नदीवरही दाट धुके दिसून आलं.
मुंबईत हवा ढासळली; AQI 187
मुंबईत थंडीची चाहूल लागली असली तरी हवेची स्थिती मात्र चिंताजनक झाली आहे. धुकट वातावरण, वाढलेली धूळ आणि वाहतुकीतील प्रदूषण यामुळे शहराचा AQI 187 पर्यंत पोहोचला आहे. PM 2.5 चे प्रमाण 108 आणि PM 10 चे प्रमाण 138 वर गेले असून मुंबई जगातील प्रदूषणग्रस्त शहरांच्या यादीत 52 व्या क्रमांकावर पोहोचली आहे.
मोठ्या प्रमाणातील विकासकामे, बांधकामातील धुळकण आणि बदलत्या हवामानामुळे मुंबईची हवा दिवसेंदिवस अधिक खराब होत असल्याचं निरीक्षण आहे. यामुळे श्वसनाचे त्रास वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या परिस्थितीकडे मुंबई महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ विशेष लक्ष ठेवून आहेत.




