बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे केरळ, आंध्र, तामिळनाडूला मुसळधार पावसाचा अलर्ट; महाराष्ट्रात तापमान 10 अंशांच्या खाली
राज्याबरोबरच संपूर्ण देशात गेल्या काही दिवसांपासून वातावरण सतत बदलत आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला झालेल्या जोरदार पावसानंतर काही दिवसांनी गारठ्याने हजेरी लावली. महाराष्ट्रातील अनेक भागांत तापमान घसरत असून थंडीची लाट जाणवू लागली आहे. निफाड, जळगाव आणि जेऊर येथे तापमान 10 अंशांच्या खाली नोंदले गेल्याने राज्यात गुलाबी थंडीचा चांगलाच अनुभव येऊ लागला आहे.
पुढील काही दिवस महाराष्ट्रात थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दुसरीकडे देशातील पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या भागांतही थंडीची लाट तीव्र होत आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे दक्षिण भारतातील पावसाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. केरळमध्ये 16 ते 20 नोव्हेंबरदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पुराचा संभव असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा कठोर सल्ला देण्यात आला आहे.
केवळ केरळच नव्हे तर आंध्र प्रदेशच्या किनारी पट्ट्यालाही 17 व 18 नोव्हेंबर रोजी जोरदार पाऊस आणि तीव्र वाऱ्यांचा धोका आहे. तामिळनाडू आणि अंडमान-निकोबार बेटांमध्येही पुढील काही दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दक्षिण भारतावर पुन्हा एकदा पावसाचे संकट तर उत्तर आणि पश्चिम भारतात हिवाळ्याचा प्रकोप देश सध्या दुहेरी हवामान बदलाचा सामना करत आहे.




