मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; काही भागात उष्णतेची लाटही कायम.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे चढउतार दिसून येत आहेत. दिवसा तापमानात वाढ होऊन उकाडा जाणवत असताना दुसरीकडे पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने 15 ते 19 मार्च दरम्यान राज्यातील अनेक भागांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर भारतात सध्या पश्चिमी विक्षोभ सक्रिय असून त्यासोबत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या वातावरणीय बदलांमुळे पंजाब, हरियाणा आणि राजस्थानसह अनेक उत्तरेकडील राज्यांमध्ये पाऊस, वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रणालीचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावरही होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
16 मार्च रोजी सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर जालना, संभाजीनगर, हिंगोली, नांदेड आणि भंडारा येथे हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
17 मार्च रोजी सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट कायम राहणार आहे. तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील इतर भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे.
18 मार्च रोजी सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित भागांत हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
19 मार्च रोजी नंदुरबार, धुळे, नाशिक, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला असून राज्यातील इतर ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, मराठवाड्यात 16 ते 19 मार्चदरम्यान काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात काहीशी घट होण्याचा अंदाज आहे. तसेच पुढील पाच दिवसांत किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.




