मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी रणधुमाळी सुरू, 30 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत
महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिकेसह 29 महापालिकांच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा झाल्यानंतर आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांना 30 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून त्यामुळे राज्यातील महापालिका निवडणुकांचा राजकीय रणसंग्राम आता प्रत्यक्षात सुरू झाला आहे. मात्र अनेक ठिकाणी पक्षीय युती आणि आघाड्यांबाबत अजूनही स्पष्टता नसल्याने अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी किती उमेदवार पुढे येतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नागपूर महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेला सुरुवात
नागपूर महानगरपालिकेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जात आहेत. 30 डिसेंबरपर्यंत इच्छुकांना संबंधित झोन कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहे. शहरातील 38 प्रभागांचे दहा झोनमध्ये विभाजन करण्यात आले असून प्रत्येक झोनमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेतही निवडणुकीची गती
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षांतर्गत जागावाटप आणि उमेदवार निश्चितीवर चर्चा सुरू असतानाच आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून यासाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.
भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी
मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा भाजपचा निर्णय असल्याचे संकेत मिळत आहेत. पुणे महापालिकेसाठी भाजपकडून प्रभागनिहाय उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता असून, या यादीत किमान 80 उमेदवारांचा समावेश असणार असल्याचे पक्षनेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची सावध भूमिका
महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर सध्या सावध भूमिका घेतली जात आहे. जागावाटपात योग्य न्याय मिळाल्यासच सहभागी व्हावे, अन्यथा महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत राहावे, अशा सूचना प्रदेश काँग्रेसकडून शहर पातळीवर देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अजित पवारांची पुण्यात ठाण मांडून तयारी
उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांसाठी त्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून, गेल्या दोन दिवसांपासून पक्षप्रवेशाचे कार्यक्रमही सुरू आहेत. आजही अनेक इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप–शिंदे शिवसेना युती निश्चित
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतील युतीवर अंतिम शिक्कामोर्तब झाले असल्याचा दावा खासदार श्रीरंग बारणेंनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच संयुक्त पत्रकार परिषदेत याची औपचारिक घोषणा होणार आहे. या युतीत शिवसेनेने 30 जागांची मागणी केली असून कोणतीही रस्सीखेच न करता पारंपरिक भाजप-शिवसेना युती कायम ठेवण्याचा अंतिम निर्णय झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.




