राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेत या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार, २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबरला निकाल घोषित केला जाणार आहे. या घोषणेनंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक रणसंग्रामासाठी तयारीला सुरुवात केली आहे.
निवडणूक आयोगाकडून नुकतीच ४३५ पक्षांची नवी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गटांसह अनेक पक्षांचा समावेश आहे. आयोगाने ‘मशाल’ आणि ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या दोन्ही चिन्हांना स्थान कायम ठेवले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे या स्थानिक निवडणुकांतही हीच चिन्हे राहणार आहेत.
राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या यादीत ५ राष्ट्रीय पक्ष, महाराष्ट्रातील ५ राज्यस्तरीय पक्ष आणि इतर राज्यांतील ९ राज्यस्तरीय पक्षांचा समावेश करण्यात आला आहे. एकूण ४१६ मान्यताप्राप्त पक्षांच्या चिन्हांसह ही यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यात शिवसेना (Thackeray) – ‘मशाल’, शिवसेना (Shide) – ‘धनुष्यबाण’, राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar) – ‘घड्याळ’, आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar) – ‘तुतारी वाजवणारा माणूस’ ही चारही चिन्हे अधिकृतरीत्या कायम ठेवण्यात आली आहेत. मात्र या चिन्हांवरील अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून राहील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीत ‘तुतारी वाजवणारा माणूस’ आणि ‘पिपाणी’ या दोन चिन्हांमुळे मतविभाजन झाल्याची तक्रार राष्ट्रवादी (Sharad Pawar) गटाने केली होती. त्यामुळे त्यांनी ‘पिपाणी’ हे चिन्ह रद्द करण्याची मागणी केली होती. अखेर आयोगाने ‘पिपाणी’ चिन्ह वगळून फक्त ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह कायम ठेवले, ज्यामुळे शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, आरक्षण जाहीर झाल्यानंतर स्थानिक स्तरावर उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष सुरू झाला आहे. शिवडीतील प्रभाग क्रमांक २०६ सर्वसाधारण गटासाठी खुला झाल्याने शिवसेना (ठाकरे गट) चे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांचा मार्ग मोकळा झाला आहे. २०१७ मध्ये याच प्रभागातून निवडून आलेल्या पडवळ यांचा पुन्हा उमेदवारीचा मार्ग खुला झाल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांच्या रोषणाईत जल्लोष केला आणि त्यांचे अभिनंदन केले.




