मराठवाड्यातील नांदेड,परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील अनेक गावांना आज सकाळी भूकंपाचे धक्के बसले. सकाळी सुमारे 8:40 वाजता जमिनीला कंप जाणवल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले आणि काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगारा शिंदे आणि आसपासच्या गावांमध्ये हे धक्के अधिक तीव्रतेने जाणवले.
स्थानिकांच्या मते, 2017 पासून या भागात अधूनमधून सौम्य भूकंप होत असले तरी आजचा धक्का तुलनेने अधिक तीव्र होता. भूकंप मापन केंद्रांनी या हालचालींची नोंद घेतली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही ठोस सूचना किंवा आपत्कालीन उपाययोजनांची माहिती देण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि चिंता वाढली आहे. सुदैवाने, या घटनेत जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची अधिकृत नोंद अद्याप समोर आलेली नाही.




