सिलेंडर ६० रुपयांनी महागले; कतारमधील पुरवठा विस्कळीत झाल्याने अमेरिकेकडून मदतीचा हात
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आणखी महिनाभर लांबण्याची चिन्हे असल्याने भारताच्या ऊर्जा सुरक्षेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. इराणने कतारमधील महत्त्वाच्या रिफायनरींवर हल्ला केल्यामुळे तिथून होणारा गॅस पुरवठा खंडित झाला आहे. याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला असून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने ‘अत्यावश्यक वस्तू अधिनियम’ लागू केला असून सरकारी तेल कंपन्यांना एलपीजी (LPG) उत्पादन युद्धपातळीवर वाढवण्याचे कठोर आदेश दिले आहेत.
भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा गॅस आयातदार देश असून आपली दोन तृतीयांश गरज आयातीवर अवलंबून आहे. कतारमधील संकटामुळे निर्माण झालेली ही टंचाई भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने आता अमेरिकेचा पर्याय निवडला आहे. भारतीय तेल कंपन्यांनी अमेरिकेसोबत वार्षिक २.२ मेट्रिक टन गॅस आयातीचा करार केला असून जानेवारीपासून हा पुरवठा सुरू झाला आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी जनतेला आश्वस्त केले आहे की, केवळ होर्मुझची सामुद्रधुनीच नव्हे तर इतरही पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे सध्याची दरवाढ आणि तुटवडा ही तात्पुरती स्थिती असून ३३ कोटींहून अधिक ग्राहकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.




