राज्यातील विविध शहरांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई, नागपूर आणि अमरावती येथे परिस्थिती अधिक गंभीर असून, ग्राहकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे.
मुंबईतील मालाड परिसरातील मालवणी भागात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. अनेकजण रिकामे सिलेंडर घेऊन एजन्सीबाहेर थांबलेले दिसत आहेत. काही ठिकाणी आपला क्रम कायम ठेवण्यासाठी सिलेंडरला कुलूप लावण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
नागपूरमध्ये परिस्थिती आणखी चिंताजनक असून, गॅस गोडाऊनमधून पुरवठा थांबलेला असल्याची माहिती समोर येत आहे. ‘नो स्टॉक’चे फलक लावण्यात आले असून, गेल्या 17 दिवसांपासून नागरिक सिलेंडरसाठी प्रतीक्षा करत आहेत. ऑनलाइन बुकिंगमध्येही अडचणी येत असल्याने लोकांचा त्रास वाढला आहे.
अमरावतीतही सलग तिसऱ्या आठवड्यात गॅस सिलेंडरसाठी रांगा कायम आहेत. या टंचाईमुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.




