आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता भारतातील इंधन पुरवठ्यावरही जाणवू लागला आहे. घरगुती एलपीजीचा पुरवठा सध्या सुरळीत असला तरी हॉटेल, उद्योग आणि व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या गॅसची कमतरता अनेक ठिकाणी जाणवू लागली आहे. काही व्यवसायांनी तर पर्याय म्हणून चुलींचा वापर सुरू केला आहे.
या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक वेगळा प्रयोग करण्यात आला आहे. संजीवनी उद्योग समूह आणि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे संशोधन केले आहे. आयात होणाऱ्या इंधनावरचे अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने हा पर्याय शोधण्यात आला आहे.
शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने यापूर्वी सीएनजी प्लांट उभारून गॅस निर्मिती सुरू केली आहे. त्यानंतर आता व्यावसायिक गॅसला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर करता येईल का, यावर संशोधन करण्यात आले. पुण्यातील एका संशोधन संस्थेच्या सहकार्याने इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हची निर्मिती करण्यात आली. विशेष म्हणजे, सध्याच्या व्यावसायिक गॅसच्या तुलनेत या स्टोव्हचा खर्च कमी असल्याने तो किफायतशीर ठरू शकतो.
कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी सांगितले की, देशात सध्या इथेनॉलचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याची परवानगी मिळाल्यानंतरही जवळपास 1000 कोटी लिटर अतिरिक्त इथेनॉल उपलब्ध आहे. सरकारने इथेनॉल गॅस किंवा इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हसारख्या प्रकल्पांना धोरणात्मक मान्यता दिल्यास सहकार क्षेत्रासाठी मोठी संधी निर्माण होऊ शकते.
ते पुढे म्हणाले की, सरकारकडून मान्यता मिळाल्यास इंधन वाहतुकीवरील खर्च कमी होईल आणि आयात होणाऱ्या इंधनावरचे अवलंबित्वही घटेल. केनियासारख्या देशात लाखो घरांमध्ये अशा प्रकारचे स्टोव्ह वापरले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. सुमारे दोन वर्षांपूर्वी पुण्यातील एका कंपनीसोबत करार करून हे संशोधन पूर्ण करण्यात आले आहे. मात्र या संदर्भात अद्याप स्पष्ट सरकारी धोरण नसल्यामुळे हा प्रकल्प सध्या थांबवण्यात आला आहे.
दरम्यान, देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी स्थानिक स्रोतांवर आधारित अशा संशोधनांना चालना देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सरकारने योग्य निर्णय घेतल्यास शेतकरी केवळ अन्नदातेच नव्हे तर ऊर्जादातेही बनू शकतील, असा विश्वास या प्रकल्पाशी संबंधितांनी व्यक्त केला आहे.




