-2.7 C
New York

Loksabha 2024 : महाराष्ट्राचा कौल पेटीबंद; निकालाची प्रतिक्षा ४ जूनची

Published:

प्रतिनिधी/मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पाचव्या आणि अंतिम टप्प्यात सोमवारी राज्यातील १३ मतदारसंघात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ४८.६६ टक्के मतदान झाले. अर्थातच ही सरासरी टक्केवारी असून मतदानाची अंतिम आकडेवारी आल्यानंतर यात काहीशी भर पडणार आहे. या आकडेवारीनुसार सर्वात जास्त मतदान पालघर मतदारसंघात ५४.३२ टक्के इतके झाले असून सर्वात कमी मतदान कल्याण मतदारसंघात ४१.७० टक्के इतके झाले आहे. उन्हाळी सुटटया तसेच वाढलेला उष्मा पाहता मतदारांमध्ये फारसा उत्साह नव्हता. अगदी सकाळी अनेक ठिकाणी रांगा होत्या. वाढत्या उन्हामुळे दुपारी काही प्रमाणात गर्दी कमी झाली. मात्र, उन्ह ओसरल्यानंतर पुन्हा मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र अनेक ठिकाणी होते. पाचव्या टप्प्यात केंद्रीय मंत्री पियूष गोयल, कपिल पाटील, भारती पवार यांच्यासह वर्षा गायकवाड, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे अशा दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. मुंबईकरांनी आता आपला कौल मतदानयंत्रात बंद केला असून येत्या ४ जून रोजी मुंबईकरांच्या मनात कोण, महायुती की महाविकास आघाडी हे स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांची निवडणूक पाच टप्प्यात विभागली गेली होती. सोमवारी पाचव्या व शेवटच्या टप्प्यात राहिलेल्या १३ मतदारसंघात मतदान झाले व महाराष्ट्रातील निवडणूक रणधुमाळीची सांगता झाली. मुंबईतील सहा, ठाण्यातील तीन, नाशिकमधील दोन मतदारसंघासह पालघर व धुळे मतदारसंघात मतदान पार पडले. २०१९ ला या सर्व जागा शिवसेना भाजप युतीने जिंकल्या होत्या. पण राज्यातील राजकीय उलथापालथीमुळे यावेळी सर्वच मतदारसंघात अत्यंत चुरशीची निवडणूक होत आहे.

महाराष्ट्रातील निवडणुका या महायुती तसेच महाविकास आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. मुंबई जिंकणे तर दोन्ही बाजूंसाठी अत्यावश्यकच असल्याने शेवटच्या टप्प्यात दोन्ही बाजूंच्या दिग्गज नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद मुंबईत लावली होती. तीन दिवसांच्या अंतरात पंतप्रधान नरेंद्र मोदी दोनदा मुंबईत येउन गेले. एकदा रोड शोसाठी तर महायुतीची सांगता सभा देखील त्यांनी घेतली. भाजपासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी देखील ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे. मुंबई,ठाणे,कल्याण हे शिवसेनेचे गड मानले जाणारे भाग आहेत. या ठिकाणचे मतदार शिवसेना कोणाची यावर अंतिम शिक्कामोर्तब करणार असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दक्षिण मुंबई, ठाणे व नाशिक या जागा भाजपकडून खेचून घेतल्या आहेत. या जागा निवडून आणण्याचे आव्हान असणार आहे.
शिवाय ठाणे या आपल्या बालेकिल्ल्यात विजय मिळवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. शिवाय कल्याणमध्ये त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे मैदानात आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासाठीही हा टप्पा महत्वाचा असणार आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना पाचव्या टप्प्यातील 13 पैकी मुंबईत चार, ठाण्यातील दोन, याशिवाय नाशिक व पालघर अशा आठ लोकसभा मतदारसंघांत निवडणूक लढवत आहे. यातील सहा ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेशी त्यांचा थेट सामना होणार आहे. भाजपने शिंदेसेना, अजितदादांसोबत यावेळी मनसेचेही इंजिन जोडले आहे. मनसेची मते महायुतीला कशी ट्रान्स्फर होतील, यावर काही उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

Loksabha 2024 : सोमवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची मतदानाची सरासरी टक्केवारी


भिवंडी- ४८.८९ टक्के
धुळे- ४८.८१ टक्के
दिंडोरी- ५७.०६ टक्के
कल्याण – ४१.७० टक्के
मुंबई उत्तर – ४६.९१ टक्के
मुंबई उत्तर मध्य – ४७.३२ टक्के
मुंबई उत्तर पूर्व – ४८.६७ टक्के
मुंबई उत्तर पश्चिम – ४९.७९ टक्के
मुंबई दक्षिण – ४४.२२ टक्के
मुंबई दक्षिण मध्य- ४८.२६ टक्के
नाशिक – ५१.१६ टक्के
पालघर- ५४.३२ टक्के
ठाणे – ४५.३८ टक्के

Loksabha 2024 : पाचवा टप्पा १३ मतदारसंघ, २६४ उमेदवार प्रमुख लढती

धुळे – सुभाष भामरे (भाजप)
शोभा बच्छाव ( काँग्रेस)

दिंडोरी – डॉ. भारती पवार ( भाजप)
भास्कर भगरे ( राष्ट्रवादी)

नाशिक – हेमंत गोडसे ( शिवसेना शिंदे)
राजाभाऊ वाझे ( शिवसेना ठाकरे)

पालघर – भारती कामडी (शिवसेना ठाकरे)
हेमंत विष्णू सावरा ( भाजप)
राजेश पाटील (बहुजन विकास आघाडी)

भिवंडी – कपिल पाटील ( भाजप)
बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी शरद पवार)
निलेश सांबरे (अपक्ष)

कल्याण – श्रीकांत शिंदे ( शिवसेना शिंदे)
वैशाली दरेकर राणे ( शिवसेना ठाकरे)

ठाणे – राजन विचारे ( शिवसेना ठाकरे)
नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे)

मुंबई उत्तर – पियूष गोयल (भाजप)
भूषण पाटील ( काँग्रेस)

मुंबई उत्तर पश्चिम – अमोल किर्तीकर ( शिवसेना ठाकरे)
रवींद्र वायकर ( शिवसेना शिंदे)

मुंबई उत्तर पूर्व – मिहिर कोटेचा (भाजप)
संजय दिना पाटील (शिवसेना)

मुंबई उत्तर मध्य – वर्षा गायकवाड ( काँग्रेस)
उज्वल निकम ( भाजप)

मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे ( शिवसेना शिंदे)
अनिल देसाई ( शिवसेना ठाकरे)

मुंबई दक्षिण – अरविंद सावंत ( शिवसेना ठाकरे)
यामिनी जाधव ( शिवसेना शिंदे)

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img