बिअरमधील पोषक घटक केस मजबूत व चमकदार बनवतात का? तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घ्या
केसांची योग्य निगा राखण्यासाठी लोक विविध उपाय आजमावत असतात. तेल, मास्क, सिरम यानंतर आता केसांच्या सौंदर्य उत्पादनांच्या यादीत थेट बिअरचाही समावेश झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या जगभरात बिअरचा वापर केसांची वाढ सुधारण्यासाठी आणि केस निरोगी ठेवण्यासाठी केला जात असल्याचा ट्रेंड वाढताना दिसतोय. बिअर शॅम्पू, बिअर हेअर पॅक अशा स्वरूपात अनेकजण आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये बिअरचा वापर करत आहेत.
नववर्षाच्या स्वागतासाठी जिथे अनेकजण सेलिब्रेशनच्या तयारीत असतात, तिथेच बिअरचा वापर केवळ आनंदोत्सवापुरता मर्यादित न राहता सौंदर्याची काळजी घेण्यासाठीही होत असल्याचं दिसून येत आहे. मात्र खरंच बिअर केसांसाठी फायदेशीर आहे का, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत.
बिअरचे केसांसाठी संभाव्य फायदे:
तज्ज्ञांच्या मते, बिअरमध्ये असलेले काही पोषक घटक केसांच्या आरोग्यास हातभार लावू शकतात.
- बिअरमध्ये प्रोटीन, बी-समूहातील जीवनसत्त्वे आणि फ्लेवोनॉइड्ससारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे केसांना मजबुती देण्यास मदत करतात.
- यामध्ये सेलेनियम आणि सिलिकॉनसारखी खनिजेही असतात. या घटकांच्या कमतरतेमुळे केस गळणे आणि अकाली पांढरे होण्याच्या समस्या वाढू शकतात.
- व्हिटॅमिन बी आणि बी12 केसांचा नैसर्गिक रंग टिकवण्यास मदत करतात.
- झिंक, फोलेट, बायोटिन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे घटक केस तुटणे, कोरडेपणा आणि नुकसान कमी करण्यास उपयुक्त मानले जातात.
- काही महिलांकडून कोंड्याची समस्या कमी करण्यासाठीही बिअरचा वापर केला जातो. कारण बिअरमध्ये बुरशीविरोधी गुणधर्म असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
मात्र संवेदनशील त्वचा किंवा केस असलेल्या व्यक्तींनी बिअरचा वापर करण्याआधी हेअर एक्सपर्ट्सचा सल्ला घेणं आवश्यक असल्याचंही तज्ज्ञ स्पष्ट करतात.
केसांवर बिअर वापरण्याची योग्य पद्धत:
- वापरासाठी नेहमी चांगल्या दर्जाची बिअर घ्यावी आणि तिची एक्सपायरी तारीख तपासावी.
- बिअर थेट थंड अवस्थेत वापरू नये. वापरण्यापूर्वी अर्धा तास फ्रिजबाहेर ठेवावी.
- बिअर सामान्य तापमानावर आल्यानंतरच केसांवर वापरावी.
- आधी नेहमीप्रमाणे शॅम्पू करून केस धुवावेत.
- शॅम्पूनंतर कंडिशनरऐवजी केसांच्या लांबीप्रमाणे बिअर ओतावी.
- हलक्या हाताने टाळू आणि केसांची मालिश करावी.
- काही वेळानंतर स्वच्छ पाण्याने केस नीट धुवावेत.
योग्य पद्धतीने आणि मर्यादित वापर केल्यास बिअर केसांच्या सौंदर्यासाठी उपयुक्त ठरू शकते, मात्र अति प्रयोग टाळणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.




