लिंबासारखा सुगंध आणि औषधी गुणांची खाण; तणावमुक्तीपासून पचनापर्यंत ‘या’ हर्बल वनस्पतीचे आहेत अद्भूत फायदे
आजच्या धकाधकीच्या प्रवासात मानसिक ताण आणि अपुरी झोप ही एक मोठी समस्या बनली आहे. यावर नैसर्गिक उपाय शोधणाऱ्यांसाठी ‘लेमन बाम’ ही वनस्पती एक प्रभावी औषध ठरत आहे. नावानुसारच लिंबासारखा मनमोहक सुगंध देणारी ही वनस्पती केवळ चहापुरती मर्यादित नसून, ती शरीर आणि मन या दोन्हीला उभारी देण्याचे काम करते. विशेषतः हर्बल टीच्या स्वरूपात याचे सेवन केल्याने मेंदूला शांतता मिळते आणि दिवसभराचा थकवा क्षणात दूर होण्यास मदत होते. ज्यांना रात्री कुस बदलूनही झोप येत नाही, अशा लोकांसाठी लेमन बामचा चहा एका नैसर्गिक ‘स्लीपिंग पिल’सारखा काम करतो, ज्यामुळे शरीर पूर्णपणे रिलॅक्स होते.
आरोग्यासोबतच सौंदर्याच्या बाबतीतही लेमन बाम मागे नाही. यामध्ये मुबलक प्रमाणात असलेले अँटिऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला संसर्गापासून वाचवतात, म्हणूनच अनेक स्किन केअर उत्पादनांमध्ये याचे तेल वापरले जाते. पोटाचे विकार जसे की गॅस आणि अपचन यावरही लेमन बाम अत्यंत गुणकारी मानला जातो. बाजारात याची पाने, तेल आणि कॅप्सूल सहज उपलब्ध असल्या तरी, त्याचा वापर चहाच्या स्वरूपात करणे अधिक लोकप्रिय आहे. मात्र, कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही श्रेयस्कर ठरते, जेणेकरून तुम्हाला याचे योग्य आणि सुरक्षित फायदे मिळतील.




