पत्रकार ते केंद्रीय मंत्री असा थक्क करणारा प्रवास; आखाती युद्धावेळी भारतीयांच्या सुटकेत बजावली होती महत्त्वाची भूमिका
भारतीय राजकारणातील एक प्रगल्भ चेहरा आणि केरळच्या वडकारा मतदारसंघाचे सलग सहावेळा प्रतिनिधित्व केलेले माजी केंद्रीय मंत्री के. पी. उन्नीकृष्णन यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. कोझिकोड येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने तीन दशकांहून अधिक काळ चाललेल्या एका ध्येयनिष्ठ राजकीय पर्वाचा अंत झाला आहे. २० सप्टेंबर १९३६ रोजी जन्मलेल्या उन्नीकृष्णन यांनी चेन्नईतून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले होते. पूर्णवेळ राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी पत्रकार म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
उन्नीकृष्णन यांची राजकीय कारकीर्द अत्यंत प्रेरणादायी होती. १९७१ मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर वडकारा येथून निवडून आलेल्या उन्नीकृष्णन यांनी १९७१ ते १९९१ या काळात सलग सहा लोकसभा निवडणुका जिंकून संसदेत आपला दबदबा निर्माण केला. समाजवादी विचारसरणीचा वारसा जपणाऱ्या उन्नीकृष्णन यांनी पुढे काँग्रेस (यु) आणि भारतीय काँग्रेस (समाजवादी) या पक्षांचेही नेतृत्व केले. व्ही. पी. सिंह यांच्या मंत्रिमंडळात (१९८९-९०) त्यांनी दूरसंचार, नौवहन आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. विशेष म्हणजे, आखाती युद्धाच्या भीषण संकटात अडकलेल्या हजारो भारतीयांना मायदेशी सुखरूप आणण्याच्या मोहिमेत त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
१९९६ च्या पराभवानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती स्वीकारली आणि आपले उर्वरित आयुष्य वाचन अन् लेखनात व्यतीत केले. संसदेतील लोकलेखा समितीचे सदस्य आणि काँग्रेस (धर्मनिरपेक्ष) चे नेते म्हणून त्यांनी केलेले कार्य आजही स्मरणात ठेवले जाते. त्यांच्या जाण्याने केवळ केरळचेच नाही, तर देशाचे एक अभ्यासू नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार असून, राजकीय वर्तुळातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.




