इराणवर इस्रायल-अमेरिकेच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी ठार झाल्याची बातमी समोर येताच जगभरात खळबळ उडाली. या वृत्तामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अनेक देशांमध्ये आणि इराणमध्येही खामेनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.
मात्र, याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री एलनाज नौरोजी हिने वेगळी भूमिका घेतली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत या बातमीवर आनंद व्यक्त केला. देवाचे आभार मानत तिने हा क्षण अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आल्याचे म्हटले.
जॉन अब्राहमसोबत तेहरान या चित्रपटात झळकलेली एलनाज मूळची इराणची असून तिचा जन्म तेहरानमध्ये झाला आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिने विविध चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. विशेषतः सेक्रेड गेम्समधील भूमिकेमुळे ती चर्चेत आली होती.
एलनाज नौरोजी गेल्या काही काळापासून इराणमधील मानवाधिकार आणि स्वातंत्र्याच्या मुद्द्यांवर आवाज उठवत होती. खामेनी यांच्या कथित मृत्यूची बातमी शेअर करत तिने “धन्यवाद” असे लिहिले आणि व्हिडीओमध्ये म्हटले की, ती आणि अनेक इराणी नागरिक गेली 47 वर्षे या दिवसाची वाट पाहत होते. तिने आपल्या संदेशात “आपण एका हुकूमशहाच्या मृत्यूचा आनंद साजरा करत आहोत” असे स्पष्ट शब्दांत म्हटले आणि टाळ्या व हार्ट इमोजीद्वारे आपली भावना व्यक्त केली. दरम्यान, इराणमध्ये शोककळा पसरलेली असताना अभिनेत्रीच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.




