हर्षाली थविल आघाडीवर, साध्या घरातून शहराच्या प्रथम नागरिकपदापर्यंतचा प्रवास चर्चेत
कल्याण-डोंबिवली (Kalyan Dombivali) महानगरपालिकेच्या सत्तासमीकरणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. महापौरपद अनुसूचित जमाती (ST) महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने राजकीय गणिते पूर्णपणे बदलली असून, या निर्णयाचा सर्वाधिक फटका भाजपला बसला आहे. भाजपकडे या प्रवर्गातील एकही नगरसेवक नसल्याने ते महापौरपदाच्या शर्यतीतून तांत्रिकदृष्ट्या बाहेर पडले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका हर्षाली थविल यांचे नाव महापौरपदासाठी सर्वाधिक चर्चेत आहे. केडीएमसी महापौरपदासाठी झालेल्या सोडतीनंतर हे पद ST प्रवर्गासाठी राखीव झाल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर शिवसेनेचे पारडे जड झाले.
शिंदे गटाकडे या प्रवर्गातील दोन सक्षम उमेदवार असून, हर्षाली थविल आणि किरण भांगले ही नावे समोर आहेत. मात्र हर्षाली थविल यांचा अनुभव आणि कामाचा आलेख पाहता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या मनसेने आपल्या पाच नगरसेवकांसह शिवसेनेला पाठिंबा दिल्याने महायुतीचे संख्याबळ आणखी मजबूत झाले आहे. दुसरीकडे भाजपने महापौरपदाऐवजी अधिकृत गट नोंदणी आणि पुढील रणनीतीवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपचे ५० नगरसेवक आज सकाळीच डोंबिवलीहून कोकण भवनाकडे रवाना झाले असून, नेते रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही हालचाल सुरू आहे.
हर्षाली थविल यांची चर्चा केवळ राजकीय कारणांमुळेच नाही, तर त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळेही होत आहे. अटाळी परिसरातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या हर्षाली आजही आपल्या पतीसोबत भाड्याच्या घरात राहतात. महापौरपदासाठी त्यांचे नाव पुढे येताच त्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. “तिने प्रामाणिकपणे लोकांची सेवा करावी, आमच्या अपेक्षा काहीच नाहीत,” अशी भावना त्यांच्या आईने व्यक्त केली. एका सामान्य कुटुंबातील मुलगी शहराच्या प्रथम नागरिकपदापर्यंत पोहोचणार या कल्पनेने अटाळी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिका प्रशासनाने महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले असून, महापौरपदासाठी २९ आणि ३० जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या वेळेत अर्ज दाखल करता येणार आहेत. येत्या ३ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर निवडणूक होणार असून, त्याच दिवशी सकाळी विशेष सर्वसाधारण सभेत नव्या महापौरांची घोषणा केली जाणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीत अडीच-अडीच वर्षांचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. महापौरपदाच्या शर्यतीत नसले तरी भाजप उपमहापौरपद किंवा स्थायी समिती सभापतीपदावर आपली पकड मजबूत ठेवण्याच्या तयारीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.




