बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतल्यानंतरही करुणा मुंडे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला असून निवडणुकीत नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, ही निवडणूक केवळ राजकारणासाठी नसून एका व्यक्तीस न्याय मिळवून देण्यासाठी आपण मैदानात उतरलो आहोत. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि महायुती सरकारवर टीका करत काही गंभीर आरोपही केले.
तसेच अजित पवार यांच्या कथित अपघात प्रकरणावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “इतका कालावधी लोटल्यानंतरही हा अपघात होता की काहीतरी वेगळं, याबाबत स्पष्टता नाही. मोठ्या नेत्यालाच न्याय मिळत नसेल तर सामान्य नागरिकांची अवस्था काय होईल?” असा सवाल त्यांनी केला.
करुणा मुंडे यांनी सांगितले की, उमेदवारी मागे घेण्यासाठी अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. पार्थ पवार यांनीही त्यांना फोन केल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक लढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
“जनतेने संधी दिल्यास मी त्याचा योग्य उपयोग करेन,” असे म्हणत त्यांनी आपल्या उमेदवारीवर ठाम राहण्याचा पुनरुच्चार केला. त्यांच्या या निर्णयामुळे बारामती पोटनिवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.




