करिश्मा कपूर हिच्या मुलांची कोर्टात नवी मागणी ?
दिवंगत बिझनेसमन संजय कपूर (Sanjay Kapoor) यांच्या 30,000 कोटी रुपयांच्या संपत्तीवरून सध्या वाद सुरू आहे. हा वाद दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला आहे. करिश्मा कपूरची मुलं समायरा आणि कियान यांनी संजय यांची दुसरी पत्नी प्रिया सचदेव कपूर यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. करिश्मा कपूरची मुलं, समायरा आणि कियान, यांची अशी मागणी आहे की, त्यांची सावत्र आई, प्रिया सचदेव हिने मालमत्तेपासून लांब रहावे, तिने त्यात काहीही छेडछडा करू नये. त्यामुळेच त्यांनी तिच्याविरुद्ध एक नवीन याचिका दाखल केली आहे. जोपर्यंत हे प्रकरण पूर्णपणे सोडवले जात नाही, तोपर्यंत प्रियाला संजयच्या मालमत्तेचे हस्तांतरण करण्याचा किंवा त्यात कोणताही बदल करण्याचा अधिकार देऊ नये अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. या याचिकेवर उद्या म्हणजे 20 नोव्हेंबर रोजू पुढील सुनावणी होणार असून या मागणीवर कोर्ट काय निर्णय देत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
यापूर्वी, करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि संजय कपूर यांची मुलं समायरा आणि कियान यांनी 11 नोव्हेंबर रोजी कोर्टाकडे मूळ मृत्युपत्राची पडताळणी करण्याची विनंती केली होती, जे प्रियाने ऑक्टोबरमध्ये सादर केले होते. या मृत्युपत्रात अनेक विसंगती असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच त्यांनी या मृत्युपत्रातील सह्यांवरही आक्षेप घेतला, परंतु प्रियाने त्यांना विरोध केला. त्यानंतर, 17 नोव्हेंबर रोजी, जॉइंट रजिस्ट्रार यांनी समायरा आणि कियान यांच्या याचिकेवर पुन्हा सुनावणी केली. जॉइंट रजिस्ट्रारनी प्रिया सचदेव आणि श्रद्धा सुरी मारवाह यांना तीन आठवड्यांच्या आत त्यांच्या आक्षेपांवर लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. आता या खटल्याची सुनावणी 16 डिसेंबर रोजी होणार आहे. करिश्मा कपूर आज या कायदेशीर लढाईत सहभागी नसली तरी, ती समायरा आणि कियान या तिच्या मुलांच्या वतीने न्यायालयात उपस्थित राहते.




