‘सो व्हील ऑफ फॉर्च्यून’च्या मंचावर करिश्मा अक्षयची धमाल केमिस्ट्री
बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma kapoor) गेल्या काही काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी ती सतत चर्चेत असते—कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे, तर कधी तिच्या संपत्तीमुळे. यावेळी करिश्मा तिच्या वांद्रे येथील फ्लॅट्समुळे चर्चेचा विषय ठरली आहे, आणि त्याचं कारण ठरलं आहे अभिनेता अक्षय कुमारचं मजेशीर वक्तव्य.
सध्या अक्षय कुमार (Akshay Kumar) ‘सो व्हील ऑफ फॉर्च्यून’ या लोकप्रिय शोचे सूत्रसंचालन करत आहे. याच शोमध्ये करिश्मा कपूर पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. शोदरम्यान अक्षयने करिश्मासोबतच्या आठवणींना उजाळा देत तिचं मनापासून कौतुक केलं.
“करिश्मा ही माझी पहिली हिरोईन आहे. तिच्यासोबतच माझा पहिला सिनेमा आणि पहिलं गाणं झालं. आजही ती तितकीच सुंदर दिसते,” असं म्हणत अक्षयने करिश्माचं भरभरून कौतुक केलं. यावर करिश्मानेही हसत आभार मानले.
यानंतर अक्षयने आपल्या खास विनोदी शैलीत करिश्माच्या मालमत्तेबाबत एक मजेशीर दावा केला. “वांद्र्यातल्या जवळपास प्रत्येक बिल्डिंगमध्ये करिश्माचा एक फ्लॅट आहे. खाली नावाचा बोर्ड असतो, पण ती पूर्ण नाव कधीच लिहीत नाही फक्त ‘K. Kapoor’ असं असतं. काही फ्लॅट आईच्या नावावर आहेत ‘B. Kapoor’. आता खार आणि सांताक्रुझमध्येही ती प्रॉपर्टी घेणार आहे,” असं म्हणत त्याने प्रेक्षकांना हसवून सोडलं. “बरं एक चांगली गोष्ट आहे, ती एका बिल्डिंगमध्ये फक्त एकच फ्लॅट घेते, उरलेले इतरांसाठी ठेवते,” असा टोला लगावताच संपूर्ण स्टुडिओत हशा पिकला.
दरम्यान, अक्षय आणि करिश्मा यांची जोडी प्रेक्षकांसाठी खास आहे. 1992 साली प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या पहिल्याच चित्रपटात करिश्मा कपूरने त्याच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती. प्रमोद चक्रवर्ती निर्मित या चित्रपटात अक्षयने आनंद के. मल्होत्रा, तर करिश्माने सपना सक्सेना ही भूमिका साकारली होती. या सिनेमात अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, तनुजा, राजीव वर्मा आणि विजू खोटे यांसारख्या दिग्गज कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.
एकूणच, शोच्या मंचावर जुन्या आठवणी, हलकाफुलका विनोद आणि करिश्मा अक्षयची केमिस्ट्री यामुळे प्रेक्षकांना एक खास मनोरंजनाचा अनुभव मिळाला.




